गृहमंत्री बसवराज बोम्माई : परिस्थितीनुसार प्रशिक्षणाच्या स्वरुपात बदल
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात प्रशासकीय सुधारणेसाठी वेळोवेळी प्रत्येक कर्मचाऱयामध्ये बदल होणे गरजेचे आहे. या उद्देशाने पोलीस अधिकाऱयांना नॅशनल डिफेन्स ऍकॅडमीच्या (एनडीए) धर्तीवर दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
म्हैसूरच्या कर्नाटक पोलीस अकादमीतर्फे आयोजित 35 व्या बॅचच्या प्रशिक्षणार्थी प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक व अबकारी उपअधीक्षकांच्या पासिंग परेड कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस सेवेत असणाऱयांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बदलत्या परिस्थितीनुसार असणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रशिक्षणाचे स्वरुपही बदलले पाहिजे. त्यामुळे नॅशनल डिफेन्स ऍकॅडमीकडून दिल्या जाणाऱया प्रशिक्षणाप्रमाणे राज्यातील पोलीस अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी समिती
अलीकडे सायबर गुन्हय़ांद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांना देण्यात येणाऱया प्रशिक्षण व अभ्यासक्रमात बदल करणे गरजेचे आहे. याकरिता पोलीस प्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नेतृत्त्वाखाली समिती नेमण्यात येईल, अशी माहितीही बोम्माई यांनी दिली.