मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : एकूण जिल्हे होणार चार : चारही जिल्हय़ांसाठी स्वतंत्र अधीक्षक
प्रतिनिधी / पणजी
राज्याच्या पोलीस प्रशासनामध्ये आणखी दोन पोलीस जिल्हे वाढविण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी जाहीर केले आहे. उत्तर गोव्यात म्हापसा व दक्षिण गोव्यात फोंडा असे दोन नवीन पोलीस प्रशासन जिल्हे तयार करण्यात आले असून दोन्ही जिह्यांसाठी दोन अधीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी आयआरबीच्या पोलिसांना केवळ कायदा आणि सुरक्षाव्यवस्था पुरतेच मर्यादीत न ठेवता त्यांना रोजच्या पोलीस कामात सामावून घेण्याचा विचार सुरु होता. त्याबाबत एक बैठकही झाली होती. त्याचबरोबर जिल्हा अधीक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणखी दोन जिल्हे वाढवून विद्यमान अधीक्षकांचे अधिकार क्षेत्र कमी करुन त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता उत्तर गोव्यात दोन अधीक्षक काम पहाणार आहेत तर दक्षिण गोव्यात दोन अधीक्षक काम पहाणार आहेत.
अधीक्षकांवरील कामाचा बोजा विभागणार
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली असावी तसेच गुन्हेगारी प्रकरणातही वाढ होऊ नये. अधीक्षकांवरील कामाचा ताण कमी झाल्यास त्यांच्या कामातही सुटसुटीतपणा येईल. सध्या राज्यात दक्षिण गोवा व उत्तर गोवा असे दोन अधीक्षक काम पाहत आहेत. आता दोघांच्या कामांचा भार चार अधीक्षकांमध्ये विभागला जाणार आहे.
पर्वरीपेक्षा म्हापसा जवळ असल्याने सोयीस्कर
सध्या जे दोन जिल्हे आहेत त्यांचे अधीक्षक मडगाव व पर्वरी येथील आपल्या कार्यालयात बसून कामकाज हाताळत असतात. एखाद्या व्यक्तीला जिल्हा अधीक्षकांच्या कार्यालयात यायचे असेल तर त्याला पर्वरीपर्यंत येण्यापेक्षा म्हापसा पर्यंत येणे सोयीस्कार होईल, असे पोलीस महासंचालक मुकेशकुमार मिणा यांनी सांगितले. म्हापसा जिल्हा अधीक्षकांचे कार्यालय म्हापसा येथे असेल त्यामुळे त्या परिसरातील लोकांना जिल्हा अधीक्षकांपर्यंत सहज येता येईल.
मडगावपेक्षा फोंडा लोकांना अधिक जवळ पडणार
दक्षिण गोव्यातही तशीच स्थिती होती. फोंडा व त्या भागाच्या लोकांना अधीक्षकांकडे यायचे असल्यास मडगावपर्यंत यावे लागत होते. आता त्यांना फोंडय़ाला येणे सोयीचे होईल, असेही मिणा यांनी सांगितले.
सर्वसाधारण प्रशासनातही : चार जिल्हे होण्याची शक्यता
प्रतिनिधी / पणजी
पोलीस खात्यासाठी 2 जिल्हे वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे आता भौगोलिकदृष्टय़ा व राज्याच्या सर्वसाधारण प्रशासनानुसारही संपूर्ण गोवा राज्याचे एकूण 4 जिल्हे होण्याची शक्यता असून तसे संकेत या निर्णयातून मिळत आहेत.
गोव्यात सध्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोनच जिल्हे असून त्यानुसार पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. आता पोलीस खात्याच्या यंत्रणेत 4 जिल्हे झाले आहेत. पुर्वीच्या दोन ज्ल्हिय़ांसह आता म्हापसा आणि फोंडा हे दोन अतिरिक्त जिल्हे पोलीस खात्याने वाढवून एकूण जिल्हे 4 केले आहे. त्यानुसार आता पोलीस यंत्रणा निश्चित करण्यात येणार आहे. म्हापसा व फोंडा या दोन नवीन जिह्यांसाठी आता स्वतंत्र पोलीस अधीक्षक मिळणार आहेत.
पोलीस प्रशासनानुसार आता राज्य प्रशासनातही आधीचे दोन आणि फोंडा – म्हापसा हे दोन नवे मिळून एकूण 4 जिल्हे होण्याची लक्षणे दिसत आहेत. मागे एकदा विधानसभेत आमदार रवी नाईक यांनी फोंडा वेगळा जिल्हा करण्याची मागणी केली होती आणि त्यावर विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. त्यानुसार गोव्याचे म्हापसा – फोंडा असे दोन जिल्हे वाढवण्याची ही पूर्वतयारी असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यापुढे राज्यात सध्याच्या 2 ऐवजी एकूण 4 जिल्हे होणार असल्याचे दिसून येत आहे.
फोंडय़ासाठी निर्णायक पाऊल
फोंडा हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जिल्हास्तरीय विभागाची फोंडय़ात अत्यंत आवश्यकता होती. गेल्या काही वर्षात फोंडा शहर व तालुक्याची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. येथील औद्योगिक वसाहतीमुळे परराज्यातील कामगारांचे स्थलांतरही तितकेच मोठे आहे. अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावी व जनतेला गुन्हे व इतर सामाजिक दुष्प्रवृत्तीपासून संरक्षणाची हमी मिळावी यासाठी पोलीस यंत्रणा अधीक सक्षम हवी. सरकारचा हा निर्णय त्यामुळे स्वागतार्ह असून तिसऱया जिल्हय़ाच्या निर्मितीकडे टाकलेले हे पहिले पाऊल म्हणावे लागेल.
फोंडा तालुक्यासाठी स्वतंत्र पोलीस विभाग आवश्यक असला तरी सरकारने चुकीच्या वेळी घेतलेला हा निर्णय आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. अमेरिका व अन्य प्रगत राष्ट्रांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरु झालेली आहे. अशा ही परिस्थितीत जनतेला आरोग्याच्या सुरक्षेची हमी हवी. जोपर्यंत कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत असा कुठलाच निर्णय जनतेच्या हिताचा म्हणता येणार नाही. फोंडा हा मध्यवर्ती जिल्हा व्हावा ही आमची मागणी आहे. जिल्हा निर्मितीनंतर या सर्व गोष्टी साहजिकच येतील. तूर्त सरकारने कोरोना परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करावे.
सुदिन ढवळीकर
आमदार, मडकई मतदार संघ : जिल्हा निर्मितीची नांदी ठरो…
फोंडा तालुक्यात पोलीस विभाग स्थापन करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र फोंडय़ासाठी प्रमुख मागणी तिसरा जिल्हा निर्मितीची आहे. प्रशासन खऱया अर्थाने जनतेच्या दारी येण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून तिसऱया जिल्हय़ासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मुख्यमंत्री असताना त्यासंबंधी फाईल तयार करुन स्वतंत्र अधिकारीही नेमला होता. मागील विधानसभा अधिवेशनात हाच मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांना जिल्हा मुख्यालयासाठी जागाही दाखवली आहे. मध्यवर्ती जिल्हा निर्मितीमुळे जिल्हास्तरीय सर्व सुविधा फोंडय़ात उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने पोलीस विभाग ही नांदी ठरो…!
रवी नाईक
माजी मुख्यमंत्री, आमदार फोंडा मतदार संघ : फोंडय़ासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय
फोंडय़ात पोलीस विभागाची निर्मिती हा सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. लोकसंख्या व औद्योगिक कामगारांचे स्थलांतर वाढत आहे. गुन्हय़ांवर नियंत्रण व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला अनुभवी अधिकाऱयांचे मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल. या स्वतंत्र विभागाबरोबच तालुक्यात पोलीस स्थानकांचे विभाजन होऊन छोटी छोटी पोलीस स्थानके असावीत असा आमचा प्रयत्न आहे. म्हार्दोळ पोलीस स्थानकाची निर्मिती ही त्याची सुरुवात आहे. याही पुढे जाऊन फोंडा हा तिसरा व मध्यवर्ती जिल्हा व्हावा याकडे मार्गक्रमण सुरु आहे.