अंगणवाडी नेत्या कमलताई परुळेकर यांची मागणी
प्रतिनिधी / कुडाळ:
मुलांच्या पोषण आहाराकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत अंगणवाडीचा पोषण आहार न देता कुपोषण वाढवून कोरोनाला निमंत्रित करणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करा, अशी मागणी अंगणवाडीच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
अंगणवाडीतील सहा महिने ते तीन वर्षे वयाची मुले, गरोदर व स्तनदा माता यांना पोषण आहार दिला जातो. तसेच तीन ते सहा वयोगटातील मुलांनाही पोषण आहार दिला जातो. ज्यामुळे अंगात ताकद येऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकेल. पूर्वी बचतगट धान्य विकत घेऊन ते शिजवून देत असत. पण कोरोनामुळे एकत्र येऊ शकत नसल्याने वर्षभर शासनच कोरडा आहार म्हणजे धान्य पुरविते. अंगणवाडी सेविका पालकांना ते वाटून देतात. पण ते वेळेवर पुरविले जात नाही. सिंधुदुर्गात सहा महिने ते तीन वर्षे वयोगटाचा तसेच गरोदर व स्तनदा मातांचा आहार फक्त ऑक्टोबर 2020 पर्यंतच आला. गेले आठ महिने आहारच नाही. तीन ते सहा वयोगटाचा आहार जानेवारी 2021 पर्यंतच आला, म्हणजे पाच महिने तीही मुले आहारापासून वंचित आहेत. आम्ही संघटनेच्यावतीने अनेकवेळा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यापर्यंत तक्रारी केल्या, पण पाणी कुठे मुरतेय कळतच नाही. अंगणवाडीच्या वेळेतच पुरवठादाराने आहार पुरवायचा असताना सायंकाळी सहा वाजल्यानंतरही आहार उतरून घेण्यास सांगतात. सेविकांनी नकार दिलाच, तर पर्यवेक्षक दम देतो.
मुलांचे पोट भरण्याची व्यवस्था करणार की नाही?
आता कोरोनाचा प्रभाव लहान मुलांमध्ये दिसू लागलाय. तज्ञ सांगतात, तिसऱया लाटेत तो वाढूही शकतो, म्हणून आता मुलांना सांभाळा. विशेष काळजी घेण्याचा उपदेश करणारे त्यांचे पोट भरण्याची व्यवस्था करणार आहेत की नाही?, असा सवालही श्रीमती परुळेकर यांनी केला आहे.
आधी अधिकाऱयांवर केसीस करा
पोषण आहाराकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करणाऱया अधिकाऱयांवर आधी केसीस करा आणि मगच अंगणवाडी कर्मचाऱयांना धमक्मया द्या, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
पालकमंत्र्यांनी गांभीर्याने पाहावे
अंगणवाडी कर्मचाऱयांना त्यांचे नियमित काम, वजन-उंची घेणे, लसीकरण करून घेणे, आहार वाटप करणे, गृहभेटी देणे ही कामे केलीच पाहिजेत, असे आयुक्तांचे आदेश आहेत, तरीही गृहभेटीवेळी त्यांच्या कुटुंबात कोणी आजारी असेल, तर तसे आशा व नर्सना सांगणे ही कामेही त्या करतात. त्याचे रेकॉर्डही ठेवतात. असे असताना त्यांना पथकाबरोबरच फिरावे, म्हणून पर्यवेक्षक दम देतात. प्रकल्प अधिकारी कामावरुन कमी करण्याच्या नोटिसा देतात. म्हणूनच मूलभूत आहार पुरवठय़ाच्याच कामात कसूर करणाऱया या अधिकाऱयांवर आधी केसेस करा. मग अंगणवाडी कर्मचाऱयांच्या चुका शोधा. पालकमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.