बॉलिवूडमधील अनेक कलाकार योगला स्वतःच्या जीवनाचा अविभाज्य घटक मानतात आणि यात करिना कपूरचेही नाव सामील आहे. करिनाने योगदिनी स्वतःची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. दोनवेळा मातृत्व अनुभवल्यावर कशाप्रकारे समस्यांना तोंड द्यावे लागले आणि योगमुळे शरीराच्या समस्या हळूहळू कशाप्रकारे दूर झाल्या याचा उलगडा करिनाने केला आहे.
माझा योगप्रवास 2006 मध्ये सुरू झाला होता. योगमुळे मी अत्यंत तंदुरुस्त राहू शकले. आता दोन मुले आणि चार महिन्यांच्या पोस्टपार्टमनंतर मी अत्यंत अधिक थकले होते तसेच त्रास होत होता. पूर्वीसारखी तंदुरुस्ती प्राप्त करण्याची माझी इच्छा होती. पण योगमुळे आज हळूहळू का होईना माजी तंदुरुस्ती परत येत असल्याचे करिनाने सांगितले आहे.
माझ्या योगसरावाचा वेळ केवळ माझा असतो, यात निरंतरता हीच गुरुकिल्ली असल्याचे ती सांगते. करिना चित्रपटसृष्टीतील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच ती सोशल मीडियावर स्वतःचे फिटनेस व्हिडिओज शेअर करत असते. अभिनेत्रीने फेब्रुवारी महिन्यात दुसऱया मुलाला जन्म दिला होता.
11 वर्षांचा मुलगा चीनमधी प्रख्यात योगगुरु
11 वर्षांचा एक मुलगा चीनमध्ये सर्वात कमी वयाचा योग प्रशिक्षक आहे. हा मुलगा योगप्रशिक्षणातून दर महिन्याला 16,000 डॉलर्सची (10.90 लाख रुपये) कमाई करत आहे. स्वतःच्या योगप्रशिक्षणामुळे तो चीनमध्ये स्वतःच्या वयोगटातील सर्वात धनाढय़ व्यक्ती ठरला आहे.
सुन चुयांग नावाचा हा मुलगा चिनी लोकांना योगचे धडे देतो. चीनमध्ये तो अत्यंत लोकप्रिय आहे. सून हा झेजियांग प्रांताचा रहासी आहे. केवळ चीनच नव्हे तर तो जगातील सर्वात कमी वयाचा सर्टिफाइड योगप्रशिक्षक आहे.
वयाच्या दुसऱया वर्षापासून त्याने योगचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला होता. त्याला ऑटिजमची समस्या होती. या आजारातून बाहेर पडण्यासाठी त्याच्या आईने त्याला योगकेंद्रात नेले होते. केवळ एका वर्षात सुनने अत्यंत चांगल्याप्रकारे योगसराव करण्यास सुरुवात केली होती. दोन वर्षांनी त्याने ऑटिजम आजारापासूनही बऱयाचअंशी मुक्तता मिळविली होती.
काही निर्धारित योगक्रियांमुळे मुलांच्या ऑटिजमला संपविता येते असे संशोधकांचे म्हणणे आहे. योगमुळे मुलांचा मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा उत्तम विकास होऊ लागतो. वयाच्या 6 व्या वर्षापर्यंत सून स्वतःच्या विशेष गुणवत्तेमुळे लोकप्रिय होऊ लागला. स्थानिक योग केंद्र त्याला नियुक्त करू इच्छित होते. 100 हून अधिक लोकांना सूनने योगचे प्रशिक्षण दिले आहे.