ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची आज सांगता
- 70 ग्रा. पं. साठी 15 रोजी मतदान
- 1 हजार 87 उमेदवार रिंगणात
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 70 ग्रा. पं. च्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होत असून या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार आहे. 70 ग्रा. पं. च्या एकूण 600 जागांसाठी 1 हजार 87 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आगामी एक वर्षानंतर जि. प. च्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. ग्रा. पं. निवडणूक ही जि. प. निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात असल्याने ग्रा. पं. निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.
जिल्हय़ात 431 ग्रा. पं. असल्या, तरी पाच वर्षांची मुदत संपणाऱया 70 ग्रा. पं. च्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्या दिवशी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून 18 जानेवारी रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. ग्रा. पं. निवडणुका स्थानिक पातळीवर होत असल्या, तरी सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीमध्ये लक्ष घातला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात रंगत आली आहे. जिल्हय़ात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी करण्यात आली असली, तरी बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत होत आहे.
जाहीर प्रचाराचा 13 रोजी शेवटचा दिवस असून सायंकाळी 5.30 वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार आहे. जिल्हय़ात सर्व स्थानिक स्वायत्त संस्थांमध्ये खासदार नारायण राणेंचे वर्चस्व आहे. राणे भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवून ग्रा. पं. भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेनेही विजय खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केला आहे.