विजय चौकपासून नॅशनल स्टेडियमपर्यंतच असणार संचलन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिन संचलनात यंदा अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. कोविड-19 मुळे संचलनाची लांबी कमी करण्यात आली आहे. विजय चौकपासून सुरू होत संचलन नॅशनल स्टेडियमपर्यंत पार पडणार आहे. तर दरवर्षी हे संचलन राजपथापासून सुरू होत लाल किल्ल्यापर्यंत पार पडत होते. प्रजासत्ताक दिन संचलनाद्वारे जगाला भारताचे सामर्थ्य, संस्कृती आणि वैविध्यातील एकतेचे दर्शन घडविले जाते.
कोविड-19 मुळे आगामी संचलनात अनेक बदल करण्यात आले आहेत. दरवर्षी 8.2 किलोमीटर अंतरापर्यंत चालणारे संचलन यंदा 3.3 किलोमीटरचे असणार आहे. संचलन प्रत्यक्ष अनुभवण्याची संधीही यंदा कमी लोकांना प्राप्त होणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक संचलन पाहण्यासाठी 1 लाख 15 हजार लोक उपस्थित असायचे, तर आगामी संचलनात हा आकडा 25 हजार लोकच हजर राहू शकतील. दरवर्षी 32 हजार तिकिटांची विक्री व्हायची, तर यंदा तिकीट प्राप्त करून 7500 लोकच यात सामील होऊ शकतील.
लहान मुलांना मज्जाव
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यंदा छोटय़ा मुलांना भाग घेता येणार नाही. 15 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांनाच यात सामील होता येईल. संचलनाकरता शालेय मुलांसाठी स्वतंत्र एनक्लोजर यंदा नसेल. दिव्यांग मुलेही यंदा सामील होणार नाहीत. तसेच उभे राहून संचलन पाहण्याचीही व्यवस्था नसणार आहे. आसनांनुसारच लोकांना अनुमती देण्यात येणार आहे.
संचलनातील पथक
आगामी संचलनात प्रत्येक पथकात कमी लोक असणार आहेत. पथकाकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहेत. आतापर्यंत प्रत्येक पथकात 144 लोक असायचे, परंतु आगामी संचलनात हा आकडा 96 असणार आहे. संचलनात उपस्थित आणि भाग घेणारे सर्व लोक मास्क परिधान करून असतील. प्रवेश तसेच बाहेर पडण्यासाठीचे मार्ग वाढविण्यात येणार आहेत. कोविड बुथ तयार केले जाणार असून यात डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी उपस्थित असतील.
15 जानेवारीला सराव
प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे सैन्याचे पथक सध्या सैन्यदिन संचलनाची तालीम करत आहे. 15 जानेवारी रोजी सैन्य दिन संचलनानंतर प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम होणार आहे. संचलनात सहभागी होणाऱया सर्व लोकांसाठी कोविड-बबल तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक चाचण्यानंतर आयसोलेट करण्यात आले आहे. कोविडविषयक नियमांचे पूर्ण पालन करण्यात येणार आहे.