प्रतिनिधी/ सातारा
कोल्हापूर-कागल राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याकरीता 2009 कोटी रूपये, खंबाटकी दुसऱया बोगद्याच्या उर्वरित कामासाठी 493 कोटी आणि कराड-चिपळुण नवीन राष्ट्रीय महामार्गाचे कामासाठी असे मिळुन, रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 3000 कोटी रूपयांची उपलब्धता करण्यात आली आहे. तर प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड रोप-वे च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी तत्वतः मंजूरी देऊन, पुरेसा निधी देण्याचे मान्य केले आहे. रोप-वे मुळे आध्यात्मिक आणि ऐतिहासिकदृष्टय़ा सातारा जिल्हय़ाच्या विकासाला एक वेगळी उंची आणि चालना मिळणार आहे अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्ली येथून दिली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाकरीता तसेच बोगद्याच्या कामाकरीता निधीची मागणी, सातारा जिल्हय़ातील तीन ठिकाणच्या रोप-वे चा दिलेला प्रस्ताव तसेच सातारा जिल्हय़ासह पश्चिम महाराष्ट्राच्या विविध विकासकामांच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, चालु अधिवेशन काळात, रस्ते वाहतुक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंत्रालयात सादर केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करताना किल्ले प्रतापगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड या किल्ल्यांवर जाण्यासाठी रोप-वे चा प्रस्तावास नितिन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच प्रदान करण्यात येईल असे ठामपणे सांगितले आहे.
तसेच राष्ट्रीय महामहार्गाचे शेंद्रे ते कागल टप्प्यातील सहापदरीकरणाचे कामास रूपये 2009 कोटी आणि खंबाटकी बोगद्याच्या उर्वरित कामासाठी 493 कोटी रुपये, तर चिपळुण ते कराड या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी देखिल मोठा निधी उपलब्ध करुन दिल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
कामाची निकड आणि आमची मागणी विचारात घेऊन नागरिकांच्या हितासाठी सुमारे 3000 कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल गडकरी यांचे उदयनराजे यांनी आभार मानले.