ऑनलाईन टीम / मुंबई :
महाविकास आघाडीतील नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना झाले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुरुडमधील साई रिसॉर्टची ते पाहणी करणार आहेत. या अनधिकृत रिसॉर्टवर अद्याप कारवाई का झाली नाही याची ते प्रशासनाला विचारणा करणार आहेत. निघण्यापूर्वी त्यांनी तो प्रतिकात्मक हातोडा प्रसारमाध्यमांसमोर दाखवला. त्यावेळी साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
यावेळी सोमय्या म्हणाले, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांना मी सोडणार नाही. घोटाळेबाज सरकारचा मी हातात हातोडा घेऊन सर्वनाश करणार आहे. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला. आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडू. मी जनतेची भाषा बोलतो. जनतेची भाषा बोलायला मी दापोलीला जात आहे, असेही सोमय्या म्हणाले.