देशभक्तीपर गीतांसह हिंदी, मराठी चित्रपटांच्या गितांचे सादरीकरण
प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रतिज्ञा नाट्यरंगच्या वतीने ना नफ्यासाठी, ना स्वार्थासाठी, मैफिल गरजवंतांच्या आधारासाठी… या ब्रीदवाक्यानुसार रोज एक मैफिल आणि एकाला मदत करण्यात आली. सलग 919 दिवस अखंडपणे संगीत मैफिल करीत एक हजर मैफिलींचा विश्वविक्रम केला. हॉटेल झोरबा येथील आनंद हॉलमधील एक हजाराव्या मैफिलीचे दीपप्रज्वलन आरती मोने, विकास मोने, ध्वनी संयोजक रमेश सुतार, प्रसाद जमदग्नी यांचे हस्ते करण्यात आले.
प्रतिज्ञा नाट्यरंगच्या एक हजाराव्या मैफिलीची सुरुवात देशभक्तीपर गीतांनी झाली. ही मैफिल सहा सत्रात पार पडली. दिवसभर प्रेषित शेंडगे आणि गंगाराम जाधव यांनी `मेरे देश की धरती’, `शूर आम्ही सरदार’, `म्यानातून उसळे’, `कर चले हम फिदा’ आदी देशभक्तीपर गीत सादर करून हुतात्म्यांना अभिवादन केले. प्रवीण लिंबड, मोहन घाटगे, सुरेश लोले यांनी मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार यांची गीत सादर केली. चंद्रशेखर फडणीस, दिलीप माळी यांनी रंगत आणली. निवेदन नीलांबरी फडणीस यांनी केले. नरहर कुलकर्णी आणि महेश दळवी यांनी तलत मेहमूद हेमंत कुमार आणि किशोर कुमार यांची गीत सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. येसुदास आणि मोहम्मद रफी यांची अत्यंत गाजलेली गीत शिवलाल पाटील आणि प्रवीण निंबड यांनी सादर केली. जगजीत सिंग यांच्या गझल आणि किशोर कुमार यांच्या मेलडीयस गाणी अनिल आवळे आणि अभिजीत पाटील यांनी सादर केली. मंजिरी लाटकर, चंद्रशेखर फडणीस, दिलीप माळी, महेश दळवी यांनी लता मंगेशकर, किशोर कुमार, मुकेश यांची गीत सादर करून मैफिलीची रंगत वाढवली. एक हजाराव्या विश्वविक्रमी मैफलीची वाटचाल याबाबत प्रशांत जोशी यांची मुलाखत पंडीत कंदले यांनी घेतली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जेष्ठ वादक अनिल गोडे यांनी अकॉर्डियन वाद्यावर सादर केलेल्या हिंदी, मराठी, चित्रपट गीत, बाल गीतांवर रसिकांना डोलायला लागले. निवेदन विजय जाधव, नीलांबरी जाधव, अश्विनी भोकरे, अमृता एतवडे, पंडीत कंदले यांनी केले. यावेळी ऑक्टोपॅडवर मनोज जोशी, ढोलक, ढोलकी साठी गुरु ढोले यांनी साथ केली. ध्वनि संयोजनाची बाजू रमेश सुतार व ज्ञानेश सुतार यांनी सांभाळली. बाळासाहेब कदम, विकास मोने, राजन गुणे, मनीष गाला, लीना गाला, सागर वासुदेवन अमृता वासुदेवन, अश्विनी निटवे, अरुण बाहेती, प्रसाद मुजुमदार, गिरीश सामंत यांचे सहकार्य लाभले. संयोजन राजेंद्र चौगुले आणि प्रशांत जोशी यांनी केले.