प्रतिनिधी/कोल्हापूर
पंचगंगा नदीस प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱया औद्योगिक वसाहतीतील कारखान्यावर फौजदारी करण्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी दिले. नदीकाठच्या गावातून नदीत मिसळणारे सांडपाणी थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेने सांडपाणी प्रक्रिया करणारे पथदर्शी प्रकल्प राबवण्याची सूचनाही त्यांनी केली. पंचगंगा नदी प्रदूषण आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजषीं शाहू सभागृहात विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. उद्योगातून होणाऱया प्रदूषणावर केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रविंद्र आंधळे यांनी 21 कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ते कारखाने बंद केल्याचे सांगितले. यावर विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी कोणाची गय न करता प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱया कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
डॉ. म्हैसेकर यांनी इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्याकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची जागा, त्याची सद्यस्थिती, निविदा प्रक्रिया त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीमधून निर्माण होणारे सांडपाणी, त्यांच्याकडे असणारे प्रकल्प याबाबत माहिती घेतली. प्रकल्पाचे काम न करणाऱया ठेकेदाराला काळ्या यादीत सामाविष्ट करण्याबाबत प्रस्ताव पाठवावा, असेही स्पष्ट केले.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांना इचलकरंजी परिसरातील निळी रेषा निश्चित करण्यास सांगितले. कोल्हापूर महापालिकेने बांधकाम परवाना देताना मोठय़ा सोसायटय़ा, संस्था यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केवळ बंधनकारक न करता ते सुरू आहेत का, त्याचा योग्य वापर होतोय का याच सनियंत्रण करावे. बंद असणाऱया प्रकल्पाबाबत दंडात्मक कारवाई करावी त्याशिवाय त्या पाण्याचा योग्य पुनःवापर होतो का हेही पहावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई,आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी रविंद्र आंधळे, प्रशांत गायकवाड, प्रियदर्शिनी मोरे उपस्थित होते.
‘एमएजीपी’च्या कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पंचगंगा नदी प्रदूषण आढावा बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता डी.के.महाजन गैरहजर हेते. यावेळी म्हैसेकर यांनी महाजन यांच्या अनुपस्थितीचे कारण विचारले असता ते वसूलीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. संतप्त झालेल्या म्हैसेकर यांनी ते जिल्हाधिकारी किंवा आपली परवानगी घेऊन गेले का, अशी विचारणा केली. अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
पाच मोठय़ा गावांसाठी ‘नमामी’ योजना राबवावी
पंचंगगेचे प्रदुषण रोखण्यात महापालिकेने चांगले प्रयत्न केले आहेत. फक्त 5 मोठय़ा गावांसाठी ‘नमामी चंद्रभागा’नुसार पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी प्रयत्न करण्याची सुचना केली आहे, अशी माहती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. कारखान्यांकडून ‘सीएसआर’प्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी सीईआर निधा घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 10 ऑगस्ट 2019 रोजी महापूर काळात कोल्हापूर व सांगलीतील महापुराचे उपग्रहांवरून घेण्यात आलेल्या छायाचित्रांवरून आपण अहवाल सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पंचगंगा नदीत पाच मोठय़ा ग्रामपंचायतींद्वारे मोठय़ा प्रमाणात सांडपाणी सोडले जाते, त्यांच्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवावा. किंवा एसटीपीसाठी 15 दिवसांत प्रस्ताव दिल्यास निधी दिला जाईल. पण यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी निर्णय घ्यावा. ‘नमामी चंद्रभागा’ योजनेत पुण्यातील 8, सोलापुरातील 7 गावे आहेत. त्यांच्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याच पद्धतीने पंचगंगा प्रदुषणप्रश्नी निर्णय व्हावा, अशी सुचना केल्याचेही त्यांनी सांगितले. आता सिंचनासाठी पाणी सोडण्यापुर्वी नमुने घेतले जाणार आहेत. त्यासाठी चार ठिकाणे निश्चित केली आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ नमुने घेईल. मैलायुक्त सांडपाण्याच्या नमुन्यांसाठी तहसील, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे, अशी पाच जणांची समिती स्थापन केली जाईल, कारखान्यांकडून पाणी प्रदूषण होत असेल तर त्यांच्याकडून सीएसआरप्रमाणे आता सीईआर निधी घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. इचलकरंजी नगरपालिकेने 12 एमएलडी एसटीपीसाठी जागा निश्चित केली आहे. पण यासंदर्भात पाहणी करूनच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.