9 तोळे सोन्याचे दागिने, 3 लाख रोख रक्कम लंपास
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर-बेळगाव महामार्गावरील प्रभूनगर येथे कुलूपबंद घरात मंगळवारी दुपारी चोरी होऊन घरातील ट्रेझरीमध्ये ठेवलेले 9 तोळे सोन्याचे दागिने, 3 लाख रुपये रोख असा एकूण 9 लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. सदर घर आप्पाराव शिवाजी चोपडे यांच्या मालकीचे आहे. त्यांचे खानापूरमध्ये मोबाईल दुकान आहे. त्यामुळे ते खानापूरला आले होते. घरची मंडळी घराला कुलूप घालून पाहुण्यांच्या गावी गेली होती.
दुपारच्या वेळी घरची मंडळी घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. खोलीतील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळविल्याचे निदर्शनास आले. खानापूर पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. खानापूरचे पोलीस निरिक्षक सुरेश शिंगे, क्राईम इएसआय कारजोळ व सहकारी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. बेळगावहून श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानपथक काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळले. आप्पाराव चोपडे यांचे घर मुख्य रस्त्यानजिकच आहे. अशा परिस्थितीत भर दुपारी झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे प्रभूनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आप्पाराव यांनी 2 दिवसांपूर्वीच कार विकून पैसे जमा केले होते. खानापूर पोलीस चोरीचा अधिक तपास करीत आहेत.