जॉर्जियात विरोधी पक्षनेत्यावर कारवाई – 6 व्या मजल्यावरून ताब्यात
वृत्तसंस्था/ तबिलिसी
जॉर्जियात विरोधी पक्षनेते निका मेलिया यांना मंगळवारी नाटय़मय पद्धतीने अटक करण्यात आली आहे. युनायटेड नॅशनल मुव्हमेंटच्या (युएनएम) मुख्यालयाच्या बाहेरील प्रवेशद्वारावर टाळे ठोकण्यात आले होते. पोलिसांनी हे टाळे तोडून तसेच अग्निशमन दलाची क्रेन बोलावून 6 व्या मजल्यावर जात त्यांना अटक केली आहे.
तबिलिसी न्यायालयाने निका यांना 2019 मध्ये सरकारविरोधी निदर्शनांच्या दरम्यान हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपाशी संबंधित सुनावणीपूर्वी ताब्यात घेण्याचा आदेश दिला होता.
मेलिया यांनी 12 हजार डॉलर्सची (सुमारे 9 लाख रुपये) जामिनाची रक्कम जमा करण्यास नकार दिल्यावर न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे. मेलिया हे पक्षाच्या मुख्यालयात लपून बसले होते. राजकीय संकटाला तोंड देणाऱया जॉर्जियामध्ये पंतप्रधान जियोर्गी गखारिया यांनी मागील गुरुवारी राजीनामा दिला होता. मेलिया यांना 9 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. तर मेलिया यांनी स्वतःवरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे.