प्रतिनिधी / शिराळा
विटा-अनुस्करा या राज्य महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी आज शिराळापासुन ४ किमी अंतरावर असणाऱ्या बिऊर शांतीनगर या ठिकाणी जेसीबीच्या खोऱ्याखाली सापडून एक नाग जखमी झाला होता. या नागास जास्त इजा झाल्यामुळे प्रशांत कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिराळमधील नागप्रेमींना याबाबत माहिती दिली आणि त्यांच्याकडे हा नाग सुपूर्द केला.
नागप्रेमी आणि वनविभागाने त्याच्यावर तातडीने उपचार केल्याने नागाला जीवदान मिळाले. वन खात्यातील रेंजर हणमंत पाटील यांनी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली तर डॉ. सुशांत शेणेकर, श्रीराम (बंटी) नांगरे पाटील यांनी उपचार केले. त्यांना श्री गवाने, ऋत्विक नलावडे, संतोष कदम यांचे सहकार्य लाभले. नागाची जखम झालेला भाग निर्जंतुक करण्यात आला आहे. सध्या हा नाग वनविभागाच्या देखरेखीखाली असुन पूर्ण बरा झाल्याने त्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यात येणार आहे.