शिक्षक समितीचा कौतुकास्पद संकल्प : 45 लाख खर्च अपेक्षित, पाच लाख जमाही
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
समाजाची सेवा करायला, एखाद्याला सढळ हस्ते मदत करायला मोठी संपत्तीच हवी असे नाही. त्यासाठी असावी लागते, ती दुर्दम्य इच्छाशक्ती! गेले वर्षभर कोरोनाच्या काळात प्रत्येक यंत्रणा आपापल्यापरीने छोटे-मोठे काम उभे करीत आहेत. या साऱयात मैलाचे पाऊल टाकत आदर्शवत संकल्प करीत आहेत, ते प्राथमिक शिक्षक. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन चक्क 45 लाख रुपये खर्चाचा ‘मिनी ऑक्सिजन प्लांट’च सिंधुदुर्गात उभारण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.
‘आलेल्या प्रत्येक संकटावर सहकार्यानं मात केली पाहिजे, माणसांकडून माणसांसाठी मदतीचा सदैव हात पाहिजे’, याचे तंतोतंत पालन करीत समितीच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या या अतुलनीय कामगिरीला जिल्हावासीयांतर्फे धन्यवाद द्यावेत, तेवढे थोडेच आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सुमारे 2600 सदस्य असलेली आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने झगडणारी संघटना. या शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांसाठी होणाऱया कामांबाबत अनेकदा टीकाही होताना दिसते. पण शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अशा टीका सहन करत चाललेले संघटनेचे काम शिक्षकांना उभारी देणारे असते.
राज्यासाठी आदर्श
कोरोना संकट काळात शासकीय नियम, आदेशाचे पालन करून शिक्षक शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारी म्हणून आपले काम पार पाडताना दिसतात. मात्र, त्याही पलिकडे जाऊन शिक्षक संघटना जिल्हावासियांसाठीच नव्हे, तर राज्यासाठी आदर्शवत काम उभे करू शकते, याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. आज जिल्हय़ात कोविड रुग्णांना उपचारांसाठी ऑक्सिजन बेड नाहीत, अशी स्थिती आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. तिसऱया लाटेत तर लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक व्यक्त होत आहे. अशा स्थितीत शिक्षक किंबहुना समाजाचा एक घटक या नात्याने आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून या शिक्षक संघटनेने हे शिवधनुष्य उचलण्याचा केलेला विचार महाराष्ट्राला नवीन दिशा देणारा आहे.
अन् उचलला मदतीचा विडा
कोविड काळात सिंधुदुर्गमधील रुग्णांना होणारा त्रास या शिक्षकांनी जवळून पाहिला आणि त्यातूनच ‘माणसांमधली माणुसकी माणसांनीच जपली जावी, आपापसातील आत्मियता आपुलकीने टिकली जावी’ याचे पालन करत संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, चंद्रकांत अणावकर, प्रवक्ते सुनील चव्हाण, शिक्षक नेते नंदकुमार राणे, उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, लवू चव्हाण, कार्याध्यक्ष नारायण नाईक, कोषाध्यक्ष लहू दहिफळे, प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल जाधव, पतपेढी अध्यक्ष तथा राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, राज्य संघटक, दिलीप कदम, राज्य विभागीय अध्यक्ष शरद नारकर, राज्य महिला सल्लागार सुरेखा कदम, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत मडगावकर, सुधीर गोसावी, जिल्हा सहसचिव संतोष कुडाळकर, आप्पा सावंत, सल्लागार सुगंधा तांबे, रावजी परब, सदानंद मोरे, जयसिंग गावित, संजय पाताडे, दिलीप प्रभूखानोलकर, पतपेढी संचालक जगदिश गोगटे, संतोष मोरे, त्र्यंबक आजगावकर, आनंद तांबे, राजेंद्रप्रसाद गाड, दिनकर तळवणेकर, उपाध्यक्ष नीलम बांदेकर, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सचिव, कार्यकारिणी पदाधिकरी, महिला आघाडी कार्यकारिणी व पदाधिकारी व सर्व सदस्यांनी संघटनेच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी काही भरीव काम करण्याचा विडा उचलला. यासाठी त्यांना डॉ. वादीराज सवदत्ती, डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. जी. टी. राणे, डॉ. संजय निगुडकर, डॉ. रवींद्र जोशी, डॉ. अमोघ चुबे यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यानंतर कोविड केअर सेंटर, कार्डियाक रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्लांट आदींबाबत चर्चा झाली. चर्चेतून ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा विषय पुढे आला. त्यासाठी खर्च साधारणत: 45 लाखांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.
45 लाख रुपये करणार जमा
संघटनेने आपले हे योगदान देण्याचे निश्चित करतानाच प्रशासनाशी चर्चा करून जे उपयुक्त ठरेल, ते देण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपजिल्हाधिकारी फड यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती 45 लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असलेला हा मिनी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निश्चित करण्यात आल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी सांगितले. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता असलेली आहे. या अनुषंगाने कुडाळ येथे चाईल्ड कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरसाठी हा मिनी ऑक्सिजन प्लांट किंवा तेथे प्रशासनाकडून होत असल्यास उपजिल्हा रुग्णालय कणकवलीच्या ठिकाणी हा प्लांट उभारण्याचे संघटनेने निश्चित केले आहे. त्यानुसार संघटनेने तातडीने कामही सुरू केले आहे.
तीन दिवसांत पाच लाख जमा
राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून समाजकल्याणाचा हा वसा उचलल्यानंतर समितीतर्फे तीन दिवसांपूर्वीच सर्व सभासदांना आवाहन करत स्वमर्जीने यात योगदान देण्याची विनंती करण्यात आली. या विनंतीला एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला, की तीन दिवसांत तब्बल 5 लाखांचा निधी उभा राहिला. 31 मेपर्यंत 45 लाख रुपयांचा निधी उभा राहून लवकरच आमची मिनी ऑक्सिजन प्लांटची निर्मितीही सुरू होईल, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम व सचिन मदने यांनी सांगितले.
या कार्यापुढे नतमस्तक!
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना सिंधुदुर्गमध्ये निर्माण करत असलेले हे काम राज्यासाठी आदर्शवत आहे. शिक्षक संघटना किंबहुना शिक्षक एकत्र येऊन समाजाला नवीन दिशा, नवा आदर्श घालून देऊ शकतात, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. समाजाला अशा दातृत्वाची, अशा कामाची गरज आहे. म्हणूनच येथे म्हणावेसे वाटते ‘…तुमच्यासारखी खूपच कमी आहेत, अशी लोकं, तुमच्या या कार्यापुढे आम्ही झुकवतो आमचे डोकं.’