वार्ताहर /माशेल
न भूतो.. न भविष्यतो ठरलेला डॉ. सावंत यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधी सोहळयात कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याचा उत्कंठा सर्व मतदारांना लागून राहिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर झालेल्या शपथविधी सोहळयात 8 जणांना मंत्रीपदाची व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यावेळी प्रियोळ आमदार गोविद गावडे यांची सलग दुसऱयांदा मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल प्रियोळच्या आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आभार व्यक्त केले आहे.
मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्या यशाचे पुर्ण श्रेय प्रियोळचे खंद्ये कार्यकर्त्यानी दिले आहे. मंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रीमंडळात वावरण्य़ाची संधी तसेच खूप नवीन बारकावे शिकण्याची संधी मिळाल्याचा उजाळा त्यांनी यावेळी दिला. यंदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रियोळ मतदारसंघात विकासकामांना चालना देईन असे मत त्यांनी व्यक्त केले. मंत्री गावडे यांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, गोमंतक गौड मराठाचे अध्यक्ष विश्वास गावडे, उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप व हितचिंतकांनी निवसास्थानी भेट देत शुभेच्छा दिल्या.