वार्ताहर/ एकसंबा
येथे सालाबादप्रमाणे होणारा प्रेरणा उत्सव यंदा करोनाच्या संकटामुळे साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी जोतिबा मंदिरात अभिषेक करून अश्वाची पूजा करण्यात आली. यंदा पहिल्यांदाच कोणत्याही कार्यक्रमाविना प्रेरणा उत्सव करण्यात आला आहे. परंतु परंपरा अखंडित ठेवण्यासाठी धार्मिक कार्यक्रमाद्वारे प्रेरणा उत्सव झाला. सोमवारी सकाळी जोल्ले शिक्षण संस्थेच्या आवारातून सामुहिक गुग्गुळोत्सव व पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, बसवज्योती युथ फौंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. एकसंबा-नणदी कॅम्पस येथील जोतिबा मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घेतला. याप्रसंगी बिरेश्वर संस्थेचे अध्यक्ष जयानंद जाधव, संचालक आप्पासाहेब जोल्ले, कल्लाप्पा जाधव, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्यासह भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.