स्पेनविरुद्ध होणार दोन सामने, मनप्रीत कर्णधारपदी तर सुखजीत सिंग नवा चेहरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भुवनेश्वरमध्ये स्पेनविरुद्ध होणाऱया एफआयएच प्रो लीग हॉकी लढतांसाठी भारताने 20 सदस्यीय संघाची मंगळवारी घोषणा केली असून आघाडीवीर सुखजीत सिंग या नव्या चेहऱयाला त्यात संधी देण्यात आली आहे.
26 व 27 फेब्रुवारी रोजी हे सामने होणार असून या लढतींसाठी भारताचे नेतृत्व मनप्रीत सिंग करणार आहे तर ड्रगफ्लिक स्पेशालिस्ट हरमनप्रीत सिंगकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. पंजाबचा 25 वर्षीय सुखजीत सिंग हा एकमेव नवा चेहरा या संघात दिसेल. गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या इंटरडिपार्टमेंट राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुखजीतने शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याचा कोअर गुप खेळाडूंत समावेश झाला होता.
20 सदस्यीय संघात पीआर श्रीजेश व सूरज करकेरा या दोन गोलरक्षकांचा समावेश आहे. हरमनप्रीत, मनदीप मोर, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जर्मनप्रीत सिंग, दिप्सन तिर्की हे बचावफळीत असतील. मिडफिल्डमध्ये अनुभवी खेळाडूंचा समावेश असून मनप्रीत, विवेक सागर प्रसाद, हार्दिक सिंग, जसकरन सिंग, शमशेर सिंग, निलकांता शर्मा, आकाशदीप सिंग यांचा त्यात समावेश आहे. आघाडी फळीत मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, शिलानंद लाक्रा, नवा खेळाडू सुखजीत सिंग, अभिषेक खेळतील. अलीकडेच दक्षिण आफ्रिका व फ्रान्सविरुद्ध झालेल्या लढतीत त्यांनी उत्तम प्रदर्शन केले होते. याशिवाय कृष्ण बहादुर पाठक, अमित रोहिदास, राजकुमार पाल, मोईरंगथेम रबिचंद्र सिंग, दिलप्रीत सिंग यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
स्पेनविरुद्धच्या लढतींसाठी समतोल संघ निवडला असल्याचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले. भारताने प्रो लीगमधील याआधी द.आफ्रिका व फ्रान्स यांच्याविरुद्ध झालेले चारपैकी तीन सामने जिंकले आहेत तर स्पेनला इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
भारतीय पुरुष हॉकी संघ ः गोलरक्षक-श्रीजेश, सूरज करकेरा. बचावफळी-हरमनप्रीत सिंग (उपकर्णधार), मनदीप मोर, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जर्मनप्रीत सिंग, दिप्सन तिर्की. मध्यफळी-मनप्रीत सिंग (कर्णधार), विवेक सागर प्रसाद, हार्दिक सिंग, जसकरन सिंग, शमशेर सिंग, निलकांता शर्मा, आकाशदीप सिंग. आघाडी फळी-मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, अभिषेक. राखीव खेळाडू ः कृष्ण बहादुर पाठक, अमित रोहिदास, राजकुमार पाल, एम. रबिचंद्र सिंग, दिलप्रीत सिंग.