इंटरपोलद्वारे कारवाई : गुजरात पोलिसांची माहिती
नवी दिल्ली
इंटरपोलने फरार नित्यानंदच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. कर्नाटकात नित्यानंदविरोधात बलात्काराचे प्रकरण नोंद झाल्यानंतर तो पासपोर्टविना फरार झाला आहे. भारतात बलात्कार आणि अपहरणाच्या अनेक प्रकरणात तो आरोपी असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनेने (इंटरपोल) नित्यानंदबाबत अतिरिक्त माहितीसाठी सदस्य देशांमध्ये ब्ल्यू कॉर्नर नोटीस लागू केली असून, या आधारे नित्यानंदच्या ठिकाणाचा आणि त्याच्या कृत्यांबाबतची माहिती मिळणार आहे.
गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नित्यानंदच्या अहमदाबाद आश्रमातून दोन तरुणी गायब झाल्याच्या प्रकरणी स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयने इंटरपोलद्वारे नित्यानंद विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करावी, अशी मागणी गुजरात पोलिसांनी केली होती. देशातील इंटरपोल संबंधीची सर्व प्रकरणे सीबीआयद्वारे हाताळली जातात.
जागतिक अटक वॉरंट
नित्यानंद विरोधात या महिन्यामध्ये ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. आता आम्ही रेड कॉर्नर नोटीसवर काम करत आहोत. हे नित्यानंदच्या विरोधात जागतिक अटक वॉरंट असेल. गुजरात पोलिसांकडून त्याला अगोदरही आरोपी घोषित करण्यात आले आहे, असे डीएसपी केटी कामरिया यांनी सांगितले.
इक्वाडोरकडून ‘त्या’ गोष्टींचा निराधार
नित्यानंदवर अपहरण करण्याबरोबरच मुलांकडून रोकड जमा करण्याचा आरोपही आहे. मुलांकडून जमा केलेल्या याच रकमेतून आश्रम चालविला जात होता. पोलिसांकडून त्याचा तपास सुरू असून, याचदरम्यान गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नित्यानंदने इक्वाडोरनजीक एका बेटावर आपला देश निर्माण केला आहे. यात देशाचा झेंडा आणि मुद्रा दाखविण्यात आली आहे. मात्र, इक्वाडोरकडून या सर्व गोष्टी निराधार असल्याचे सांगण्यात आले आहे.