पोलीस उपायुक्तांचे आवाहन : नोकरीच्या आमिषाने होतेय फसवणूक
प्रतिनिधी /बेळगाव
परदेशात नोकरी देण्यासाठी आवश्यक परवानाधारक एकही एजन्सी बेळगाव येथे नाही. त्यामुळे फसव्या एजन्सींपासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले. फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचनाही त्यांनी केली.
परदेशात नोकरी देण्याचे सांगून जाहिरातबाजी करणाऱया अनेक संस्था बेळगाव येथे आहेत. दरबार गल्ली येथील ट्रव्हलवर्ल्ड व शेट्टी गल्ली येथील स्टॅन्डर्ड ग्रुप या दोन संस्थांवर 15 फेब्रुवारी 2021 रोजी छापे टाकण्यात आले होते. उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली होती.
येथील मार्केट पोलीस स्थानकात इम्तियाज यरगट्टी व फारुक अब्दुलहमीद या दोघा जणांविरुद्ध भा.दं.वि. 420, इमिग्रेशन कायदा 24 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 315 पासपोर्ट, 1 लाख 13 हजार रुपये रोख रक्कम व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. इम्रानअहम्मद मुल्ला याच्यावर 28 मे 2021 रोजी येथील एपीएमसी पोलीस स्थानकात वरील कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशन-बेंगळूर यांच्याकडून आवश्यक परवाना घेतलेली एकही संस्था बेळगावात नाही. तरीही परदेशात नोकरी देण्याची जाहिरातबाजी करणाऱयासंबंधी पोलिसांना माहिती द्यावी. सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून फसवणूक करणाऱयांविषयी सतर्क राहिले तर फसवणूक टाळता येणार आहे, असेही पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले. प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेशनने दिलेली यादी पाहता या यादीत बेळगाव येथील एकाही संस्थेचे नाव नाही.