श्रावणी रविवारनिमित्त शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान समितीतर्फे आयोजन
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानात दुसरा श्रावणी रविवार भक्तिमय वातावरणात साजरा झाला. हा रविवार संस्थानतर्फे साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थान समितीतर्फे सायंकाळी भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध तबलापटू व संगीतकार यतीन तळावलीकर व सुप्रसिद्ध गायिका गौतमी हेदे बांबोळकर यांचा सहभाग असलेल्या आणि ‘अंतर्नाद क्रिएशन्स’ने निर्मिती केलेल्या ‘हरी तेथेचि भेटला’ या कोकणी व मराठी भक्तीगीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात गोमंतकीय गीतकार नंदन हेगडे देसाई, दामोदर नाईक, सुमंत देसाई यांची गीते तसेच यतीन तळावलीकर यांनी संगीतबद्ब केलेल्या ‘कृष्णा दामोदरा’, ‘नाथांचा नाथ’, ‘देवा श्री रामनाथा’ या सीडींमधील भक्तिगीते आणि ‘आषाढसरीत नाही पांढरी’, ‘सगळे आमचे सुख-दुःख’, ‘देव नाही देव्हाऱयात’, ‘शांतादुर्गे आई’ अशा अनेक नाविन्यपूर्ण रचना सादर करण्यात आल्या.
विष्णू शिरोडकर (सिंथेसाइझर), धनराज मडकईकर (हार्मोनियम), सुरजित थळी (तबला), किशोर तेली (पखवाज), सुमुख केणी व प्रा. तारानाथ होळेगद्दे (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली, तर ध्वनिनियोजन रुद्रेश फोंडेकर यांनी सांभाळले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन मडगावच्या रवींद्र केळेकर ज्ञानमंदिराचे मुख्याध्यापक अनंत अग्नी यांनी सांभाळले. श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचे अध्यक्ष कवेंद्र देसाई व समितीने हा खास कार्यक्रम ठेवला होता. दरम्यान, श्रावणी रविवारनिमित्त सकाळी महाभिषेक, आरत्या, रात्री महाप्रसाद, पुराण, पालखी मिरवणूक, आरत्या व प्रसाद असे कार्यक्रम झाले.