एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आज फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर एफसी गोवा संघाचा रिव्हर्स सामना कतारच्या अल-रय्यान एफसी संघाशी होणार आहे. हा सामना रात्री 10.30 वाजता खेळविण्यात येईल. उभय संघात झालेला पहिल्या टप्प्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता.
आपल्या मागील सामन्यात इराणच्या पर्सेपोलीस एफसी संघाविरूद्ध एफसी गोवा चार गोलानी पराभूत झाला आहे, यामुळे या सामन्यात सुधारीत कामगिरीची गरज जुआन फॅरांडोच्या संघाला असेल. अल-रय्यान संघाचे तीन पराभव व एका बरोबरीने फक्त एक गुण झाला असून ते गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर आहेत. फ्रान्सच्या विश्वचषक विजेत्या संघात असलेल्या लॉरे ब्लांक यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत असलेल्या अल-रय्यान एफसी संघाकडून या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र संघाकडून चांगली कामगिरी होऊ शकली नाही. आज होणाऱया सामन्यात केवळ क्लबसाठीच नव्हे तर कतारसाठी विजय मिळविण्याचा निर्धार प्रशिक्षक ब्लांक यांनी व्यक्त केला.
आम्हाला विजय आवश्यक आहे तसेच मागील चार सामन्यांत आम्ही चांगला खेळ केलेला नाही. एफसी गोवा संघ सर्व बाजूने समतोल असल्याने आम्हाला त्यांच्याविरूद्ध अधिक निर्धाराने खेळावे लागणार असल्याचे ब्लांक म्हणाले. यासिन ब्राहिमी, योहान बोली आणि शोजे खलीलझोदाह यांना आजच्या सामन्यात आपला दर्जा दाखवावा लागले, असे ते म्हणाले.
एफसी गोवा संघाने या स्पर्धेतील आरंभीच्या दोन सामन्यात चांगला खेळ केला, मात्र पर्सेपोलीस एफसीविरूद्धच्या दोन्ही सामन्यात त्यांचा खेळ ढेपाळला. त्यांना या दोन्ही लढतीत 2-1 आणि 4-0 अशा गोलफरकाने पराभूत व्हावे लागले.
निलंबन आणि काही खेळाडूंच्या तंदुरूस्तीच्या समस्येनेही एफसी गोवाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. जेव्हा खेळाडू पूर्ण तंदुरूस्त नसतात तेव्हा, संघाच्या निर्मिती करण्यावरही मोठा परिणाम होतो, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक जुआन फॅरांडो म्हणाले.
पर्सेपोलीस संघाविरूद्ध गोलरक्षक नवीनकुमार घेण्याचा आमचा प्लॅन फसला. आजच्या लढतीत त्याला खेळवायचे की नाही ते आम्ही सामन्यापूर्वी ठरविणार असल्याचे फॅरांडो म्हणाले. अल-रय्यान आणि आमच्यासाठी आजचा सामना अतिमहत्वाचा आहे. हा सामना पहिल्या सामन्यापेक्षा वेगळा असेल असे ते म्हणाले.