परीक्षेच्या ताणामुळे संपविले जीवन
प्रतिनिधी /बेळगाव
मूळचा इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील व सध्या शिक्षणानिमित्त बेळगाव येथे वास्तव्यास असलेल्या एका विद्यार्थ्याने आपण राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी नेहरुनगर येथे घडली.
भरत बाळासो पाटील (वय 21, रा. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी भरतने चिठ्ठी लिहून ठेवली असून ‘एक्झाम टेन्शन व फॅमिली प्रॉब्लेममुळे मी हा निर्णय घेतला आहे. माझ्याकडून कोणाची मने दुखावली असतील तर मला माफ करा, गुड बाय’ असे चिठ्ठीत नमूद केले आहे.
घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उपलब्ध माहितीनुसार भरत हा खासगी कॉलेजमध्ये डी फार्मसीचे शिक्षण घेत होता. आपल्या मित्रांसमवेत नेहरुनगर, पहिला क्रॉस परिसरात त्याने खोली केली होती.
आपण राहत असलेल्या खोलीत सोमवारी सकाळी 10.15 ते 10.30 यावेळेत प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्या करण्यापूर्वी भरतने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.