शिवबसवनगर येथील घटना, मुत्यानट्टी येथील दोघा जणांना अटक, दसरोत्सवादिवशी घडला थरार
प्रतिनिधी / बेळगाव
टाटासुमोतून फिल्मी स्टाईलने दुचाकीचा पाठलाग करत संगमेश्वरनगर येथील एका युवकाचा भीषण खून करण्यात आला आहे. दसरोत्सवादिवशी रविवारी मध्यरात्री शिवबसवनगर परिसरात हा थरार घडला आहे. या प्रकरणी मुत्यानट्टी येथील दोघा जणांना अटक करण्यात आली असून पूर्ववैमनश्यातून खुनाचा हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
शैबाज शेरखान पठाण (वय 24, रा. दुसरा क्रॉस, संगमेश्वरनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ऐन दसरोत्सवात घडलेल्या फिल्मी स्टाईल खून प्रकरणाने गँगवाडी, शिवबसवनगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच दखल घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. सोमवारी सकाळी शैबाजवर दफनविधी करण्यात आली.
या प्रकरणी बसवराज होळय़ाप्पा दड्डी (वय 26), बसवाणी सिध्दाप्पा नाईक (वय 28, दोघेही रा. मुत्यानट्टी) यांना अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.
रविवारी मध्यरात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास शैबाजचा मृत्यू झाला आहे. शैबाज हा अरफात मोहम्मद अन्सार या आपल्या मित्रासमवेत दुचाकीवरुन जात असताना केए 42 एम 0368 क्रमांकाच्या टाटासुमोतून त्यांचा पाठलाग करण्यात आला. गँगवाडी येथील ए. एम. शेख मेडीकल कॉलेजजवळ दुचाकीला सुमोने धडक मारण्यात आली.
सुमोची धडक बसताच शैबाज व अरफात दोघे खाली पडले. जीवाच्या आकांताने शैबाज तेथून पळाला. लक्ष्मण दड्डी व त्याच्या साथीदारांनी तलवार घेवून शैबाजचा पाठलाग केला. याचवेळी तो शिवबसवनगर येथील निवृत्त पोलीस उपअधिक्षक पांडुरंग यलीगार यांच्या घरात शिरला. मारेकऱयांना घरात घुसून तलावारीने सपासप वार करुन शैबाजचा काटा काढला.
गंभीर जखमी अवस्थेतील शैबाजला मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. थोडय़ा वेळात त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर सुमारे 200 हून अधिक तरुण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमा झाले. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी आदी अधिकारीही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीहल्ला करण्यात आला.
सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी केल्यानंतर सोमवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील मुस्लीम स्मशानभूमीत शैबाजवर दफनविधी करण्यात आली. यावेळी स्मशानभूमी बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खुनानंतर पोलिसांनी काही तासांत दोघा जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
चिखल उडाल्यामुळे सुरु झालेल्या संघर्षाचा खुनात रुपांतर
शैबाजच्या खुनानंतर रविवारी मध्यरात्री काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने तपास हाती घेवून त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चार वर्षांपूर्वी अंगावर चिखल उडाल्यामुळे सुरु झालेल्या संघर्षाची माहिती उजेडात आली. 9 जुलै 2016 रोजी मोटार सायकलमुळे अंगावर चिखल उडाल्यामुळे शैबाज व आरोपी बसवाणी नाईक यांच्यात हाणामारी झाली होती. काकती पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोन्ही गटात समेटही घडला होता. समेटासाठी जाताना 22 एप्रिल 2019 रोजी शैबाज व त्याच्या साथीदारांनी काकती येथील जुन्या क्लासीक बार जवळ बसवाणी नाईक (वय 27) व सचिन सिध्दाप्पा दड्डी (वय 24, दोघेही रा. मुत्यानट्टी) यांच्यावर चाकु हल्ला करण्यात आला होता. या दोन्ही तरुणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे बसवाणी व सचिन यांना खासगी इस्पितळात हलविण्यात आले होते. तेंव्हापासून या दोन्ही गटात तेढ वाढला होता. रविवारी लक्ष्मण दड्डी व त्याच्या साथीदारांनी टाटासुमोतून पाठलाग करत शैबाजचा खून केला आहे. शैबाजचे वडील शेरखान पठाण यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण दड्डीसह फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.