पुढील ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर अभिषेक वर्माचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकली गेल्यामुळे तोवर फॉर्म कायम राखणे आणि सरावावर लक्ष केंद्रित ठेवणे निश्चितच आव्हानात्मक असेल. पण, मी त्या दृष्टीने प्रयत्नांना सुरुवात केली आहे, असे आघाडीचा नेमबाज अभिषेक वर्मा म्हणाला. यंदा होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे एका वर्षाने लांबणीवर टाकली गेली. त्या पार्श्वभूमीवर एकंदरीत समीकरणे, आव्हाने कशी बदलली आहेत, याविषयी तो बोलत होता.
सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु असून याचा क्रीडापटूंच्या सरावावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यात अभिषेक वर्माचा अपवाद असण्याचे कारण नाही. ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकली गेल्याने आपल्या एकाग्रतेवर, सरावावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती अभिषेक येथे व्यक्त करतो.
‘यंदाची स्पर्धा लांबणीवर टाकल्याने तयारीसाठी नव्याने वेळ मिळेल. पण, जिथवर तयारी केली, त्या साऱया तयारीला एका अर्थाने ब्रेक बसला आहे. थोडासा अवधी मिळाला असता तर त्याचे निश्चित स्वागत केले असते. पण, एका वर्षाचा कालावधी हा खूपच असतो’, असे अभिषेक वर्माने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
30 वर्षीय वर्मा चंदिगढमधील निवासस्थानी आहे. पण, तरी त्याचे सर्व लक्ष गुरगावमधील पेईंग गेस्टहाऊसकडे आहे. त्याच ठिकाणी त्याची सरावाची सर्व आयुधे व स्कॅट आहे. स्कॅट हे आधुनिक अस्त्र असून त्याला सेन्सटर्स आहेत. इनडोअर व आऊटडोअर सरावावेळी कशी प्रगती होते आहे, हे या स्कॅटवरुन आजमावता येते.
स्कॅट हे महत्त्वाचे अस्त्रच उपलब्ध नसल्याने बरीच कुचंबणा झालेल्या अभिषेकचा सध्या डमी सराव, विविध कसरती, योगा व ध्यान यावर भर आहे.
वर्माने गतवर्षी एप्रिल महिन्यात बीजिंग विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर्स एअर पिस्तोलचे सुवर्ण जिंकत ऑलिम्पिक कोटा निश्चित केला होता.