सोनट्टी येथील घटनेने खळबळ, काकती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
फॉर्म हाऊसवर झोपलेल्या वाचमनचा अज्ञातांनी गळादाबून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा सोनट्टी (ता. बेळगाव) येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. हा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही.
लक्ष्मण नानाप्पा हुलगण्णावर (वय 45, रा. हन्नीकेरी, ता. बैलहोंगल) असे खून झालेल्या वाचमनचे नाव आहे. त्याचा मुलगा बसवराज याने काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, पोलीस उपनिरीक्षक आर. टी. लक्कणगौडर आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
सोनट्टी जवळील सुनील पाटील यांच्या फॉर्म हाऊसवर रखवालदार म्हणून लक्ष्मण काम करत होता. रखवालदारीबरोबरच तो शेतीची कामेही करायचा. गेल्या 9 महिन्यांपूर्वी तो सोनट्टीत आला होता. त्याची पत्नी व मुले गावात राहतात. या फॉर्म हाऊसवर तो एकटाच रहायचा. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्याचा अज्ञातांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे.
घटनेची माहिती समजताच काकती पोलिसांना पाचारण करण्यात आले. लक्ष्मण एकटा राहत होता. त्याचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. यासंबंधी बुधवारी रात्री काकती पोलिसांशी संपर्क साधला असता मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. हन्नीकेरी येथे अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. फॉर्म हाऊसवर राहणाऱया एकाकी वाचमनच्या खुनाच्या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी सर्व बाबींचा विचार करुन तपास करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
48 तासातील दुसरा खून ऐन दसरोत्सवा दिवशी 25 ऑक्टोबर रोजी रात्री संगमेश्वरनगर येथील शैबाज पठाण (वय 24) या तरुणाचा तलवारीने वार करुन शिवबसवनगर येथे खून करण्यात आला होता. या प्रकरणी माळमारुती पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सोनट्टी येथील फॉर्महाऊसवर खुनाचा दुसरा प्रकार घडला आहे. 48 तासातील हा दुसरा खून आहे