पालकमंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना : संदेश पारकर, सतीश सावंत यांनी वेधले लक्ष : कणकवली मुख्याधिकाऱयांचा कार्यभार तहसीलदारांकडे
वार्ताहर / कणकवली:
फोंडाघाट चेकपोस्ट स्थलांतरणाबाबत मी आठ दिवसापूर्वी सूचना देऊनही अद्याप चेकपोस्टच्या पलिकडे असलेल्या ग्रामस्थांना पास देण्याबाबतची कार्यवाही झालेली नाही. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे त्रास होत नये यादृष्टीने तातडीने कार्यवाही करा. चेकपोस्टवर महसूल खात्याचा कोतवाल व ग्रा. पं. चा एक कर्मचारी लॉकडाऊनपर्यंत कार्यरत ठेवून स्थानिक ग्रामस्थांना चेकपोस्टवरून सोडावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले.
येथील विजय भवनमध्ये अधिकाऱयांसोबत पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, माजी महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, तेजस राणे आदी उपस्थित होते.
फोंडाघाट चेकपोस्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत!
फोंडाघाट चेकपोस्टवर ग्रामस्थांना पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागते. चेकपास्टबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याकडे संदेश पारकर यांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. तर फोंडाघाटमध्ये येणारा ग्रामीण मार्ग चर मारून बंद करण्यात आला, याकडे सतीश सावंत यांनी लक्ष वेधले. त्यावर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सदर चर बुजविण्यात आल्याचे सांगितले. कोल्हापूरहून येणाऱया परजिह्यातील नागरिकांची वाहने या रस्त्याने येत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. फोंडाघाट चेकपोस्टला आज तातडीने भेट देत येथे कर्मचारी नेमणुकीबाबत कार्यवाहीची सूचना पालकमंत्र्यांनी कोळी यांना दिली.
..तर दुकानदार व ग्राहकांवरही गुन्हे!
कणकवली शहरातील होणारी गर्दी रोखण्यासाठी होम डिलीव्हरी देणे सर्वच व्यापाऱयांना शक्य नसल्याचे याबाबत आता सुरू असल्याप्रमाणेच दुकाने सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे पारकर यांनी सांगितले. त्यावर प्रांताधिकारी राजमाने यांनी दुकानांसामोर गर्दी झाली व सोशल डिस्टन्सींगचे पालन न झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरण व छ. शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरणाबाबत आढावा घेण्यात आला.
मुख्याधिकाऱयांचा कार्यभार तहसीलदारांकडे!
कणकवली शहरात ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी काम व्हायला पाहिजे, तसे काम होत नाही. कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुटीवरही नाहीत व कार्यालयातही येत नाहीत त्यामुळे त्यांचा कार्यभार अन्य अधिकाऱयांकडे देण्याची मागणी प्रांताधिकाऱयांनी केली. तसेच मुंबई – पुणे येथील चाकरमानी जिह्यात आले की कामाचा ताण अजून वाढणार असल्याकडे प्रांताधिकाऱयांनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर मुख्याधिकाऱयांचा कार्यभार तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे देण्याची मागणी श्री. पारकर व श्री. सावंत यांनी केली. मात्र तहसीलदारांकडे हा चार्ज नको, चाकरमानी आले की क्वारंटाईनचे काम वाढणार असल्याचे प्रांताधिकाऱयांना सांगितले. मात्र न. पं. मध्ये दिवसातून 1 तास कामासाठी द्या व तुमच्याकडे चार्ज घ्या, अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली.
आम्ही पारकरांचे कार्यकर्ते!
श्रीधर नाईक उद्यान व छ. शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरणाबाबत चर्चा करत असताना श्रीधर नाईक उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगीच्या आठवणी पालकमंत्री सामंत यांनी सांगितल्या. त्याचा धागा पकडून आमदार वैभव नाईक यांनी, ‘मला व पालकमंत्र्यांना राजकारणात संदेश पारकर सिनिअर आहेत, आम्ही दोघे त्यांचे कार्यकर्ते’ असे सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी आमच्यापेक्षा पारकर अधिक तरुण दिसतात, असे म्हणताच उपस्थित अधिकाऱयांपासून सर्वांमध्ये हशा पिकला.