प्रतिनिधी / फोंडा :
फोंडय़ाचे काँग्रेस आमदार रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशामुळे फोंडा पालिकेवर सत्ताबदलाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत या घडामोडी शक्य असून भापजाप्रवेशाची भेट म्हणून रितेश यांना नगराध्यक्षपद बहाल केले जाणार आहे. रितेश नाईक यांच्यासह काँग्रेसचे समर्थक असलेल्या आनंद नाईक व विलियम आगियार या अन्य दोघा नगसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे.
या नवीन राजकीय समिकरणामुळे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक हे स्वेच्छेने राजीनामा देतील की, त्यांच्यावर अवविश्वास ठराव आणण्याची वेळ येईल यासंबंधी सध्या चर्चा सुरु आहे. गेल्यावर्षी चतुर्थीपूर्वी मगो पक्षातील काही नगरसेवकांमधील अंतर्गत मतभेदातून प्रदीप नाईक यांच्यावर अविश्वास ठराव आणल्याने त्यांना नगराध्यक्षपद सोडावे लागले होते. त्यानंतर व्यंकटेश नाईक हे काँग्रेस, भाजपा व मगो समर्थक असलेल्या काही नगरसेवकांच्या पाठिंब्याने नगराध्यक्ष बनले होते. भाजपामध्ये झालेल्या अंतर्गत करारानुसार त्यांना एका वर्षासाठी हे नगराध्यक्ष बनविण्यात आले असून त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पुढील कार्यकाळासाठी उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी व त्यानंतर शांताराम कोलवेकर हे नगराध्यक्षपदाचे दावेदार होते. पण या नवीन घडामोडीमुळे रितेश नाईक हे प्रबल दावेदार ठरले असून भाजपातील वरिष्ठ नेत्यांनीही त्यांची ही अट मान्य केल्याचे वृत्त आहे. कॉग्रेसचे तिघेही नगरसेवक भाजपावासी झाल्याने फोंडा पालिकेवरील भाजपाचे संख्याबळ आठ झाले आहे. या पार्श्वभूमिवर मगो पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.