याप्रकरणी तिघा संशयिताना अटक ; फोंडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा भागात महामार्गाला जोडून असलेले भंगारअड्डय़ात गुन्हेगारी स्वरूपाच्या हरकती मागील काही दिवसापासून वाढल्या आहेत. पोलिसांतर्फे अशा भंगारअड्डेवाल्याना अभय दिल्यामुळे त्याचे बेकायदेशीर व्यवसाय फोफावलेले आहे. याची झलक चार दिवसापुर्वी अज्ञात चोरटय़ानी पळविलेले फोंडा मलनिस्सारण प्रकल्पाचे चालू स्थितीतील अवाढव्य मशिन बोणबाग-बेतोडा येथे महामार्गालागून असलेल्य़ा भंगरअडय़ात सापडल्याने मोठी खळबळ माजली आहे.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी बोणबाग-बेतोडा येथील भंगारअड्डेवाला सुबानी येलगारी (बोणबाग बेतोडा), मशिन वाहून नेणारा क्रेनवाहक आरीफ चंनगडकर (40, दत्तगड-बेतोडा) आपले मशिन म्हणून ठकविणारा गणानंद पेटकर (26,केराöफोंडा) अशा तिघा संशयिताना दोन दिवसांच्या रिमांडवर अटक करून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच आरिफ चंनगडकर यांचे टॉईग वाहन जीए 09 एफ 5396 जप्त करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार हाऊसिंग बोर्ड कुर्टी येथे एक पार्क करून ठेवलेले मलनिस्सारण प्रकल्पाच्या कंत्राटदाराचे चालू स्थितीतील पंपची जोडणी असलेला मिक्सर अज्ञातांनी पळविल्याची घटना काल रविवार 20 रोजी उघडकीस आली होती. यावेळी त्याची बाजारातील किंमत सुमारे 5 लाख रूपये असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. गणानंद पेटकर नामक युवकाने सदर मशिन आपल्या काकाचे असून तो आजारी असल्यामुळे ते विकून टाकावे असे क्रेनचालकाला सांगितले होते. त्यानुसार क्रेनचालकाने आपल्या ओळखीच्या बोणबाग येथील भंगारअड्डेवाल्याकडे डिल केली होती. कुणालाही संशय येईल या कारणामुळे सायकाळी 7 ते 8 च्या दरम्यान आरिफने आपल्या क्रेनवाहनावर मशिन जोडून बोणबाग येथे पोचविले होते. त्यानंतर पैशाची देवाणघेवाण झाली होती. रू. 5 लाखाचे मशिन नेमक्या किती रूपयामध्ये विकले याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. भंगारअड्डेवाल्यांने चोरीच्या मालाची ताबडतोब विल्हेवाट लावण्याहेतून सर्व सामान मशिनावेगळे करून ठेवले. फेंडा पोलिसांनी जलदगतीने तपास करताना त्याचा डाव त्याच्यावरच उलटविला. भंगरअड्डेवाल्याकडून किर्लोस्करचा पंप व इतर सुटे भाग जप्त करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी मुख्य सुत्रधाराला पकडण्यासाठी सापळा रचल्याची माहिती निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी दिली आहे.
लावारिस मशिन समजून चोरटय़ांनी डाव साधला
मलनिस्सारणचे प्रकल्पाचे मशिन ऑक्टोबर 2021 पासून हाऊसिंग बोर्ड कुर्टी येथील हेडगेवार विद्यालयासमोरील जागेत ठेवले होते. सामानाच्या देखरेखेसाठी एक कामगार तैनात केला होता. 19 मार्च 2022 रोजी देखरेखेसाठी ठेवलेला कामगार आपल्या मूळ गावी गेला. त्यानंतर दोन दिवसाने सामना ठेवलेल्या जागी 10 हजार लिटरचा मिक्सर व किर्लोस्कर पंपासह चार चाकांवर लोखंडी सळीने बसविण्यात आलेला युनिट क्रेनवाहनावर वाहून गायब करण्यात आला होता. फोंडा पोलिसांनी तपासाची गती वाढवून याप्रकरणी छडा लावण्यात कौतुकास्पद कामगिरी केली असून उपनिरीक्षक विभीनव शिराडकर अधिक तपास करीत आहे.