अंत्रुज कला अकादमी फोंडा आणि कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजन : रजनी ठाकुर यांना ‘सुगमोत्सव’ पुरस्कार
प्रतिनिधी /फोंडा
अंत्रुज कला अकादमी फोंडा आणि कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 11 व रविवार दि. 12 डिसें. रोजी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये ‘सुगमोत्सव’ हा सुगम संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कला मंदिरच्या परिषद सभागृहात होणाऱया या महोत्सवात गोवा व महाराष्ट्रातील गायक कलाकारांच्या सुगम संगीताच्या मैफली होणार आहेत.
अकादमीचे अध्यक्ष ऍड. शैलेंद्र नाईक यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. यावेळी कार्याध्यक्ष संदीप पेडणेकर व सहकार्याध्यक्ष राजेश देसाई हे उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन दि. 11 रोजी सायं. 5 वा. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळय़ानंतर शब्दगंध प्रस्तुत ‘नाटय़संगीत रजनी’ हा नाटय़संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात येईल. यात दशरथ नाईक, सिद्धी शेलार मलिक व सूरज सुतार हे गायक कलाकार नाटय़गीते सादर करतील. त्यांना तबल्यावर प्रसन्न साळकर व हार्मोनियमवर प्रसाद गांवस साथसंगत करणार आहेत.
दुसऱया सत्रात सायं. 6 वा. अंतर्नाद क्रिएशन प्रस्तुत ‘स्वरमंदार’ हा जुन्या आठवणी, जुनी गाणी या संकल्पनेवर आधारीत मराठी भावसंगीताचा कार्यक्रम सादर होणार आहे. झी गौरव पुरस्कार प्राप्त मुंबई येथील प्रसिद्ध संगीतकार व गायक मंदार आपटे व स्नेहा काळे हे कलाकार हा कार्यक्रम सादर करतील. त्यांना तबल्यावर यतीन तळावलीकर, हार्मोनियमवर धनराज मडकईकर, सिंथेसायझरवर विष्णू शिरोडकर व तालवाद्यावर स्मिता नाईक साथसंगत करणार आहेत. प्रदीप पंडित कार्यक्रमाचे निवेदन करतील.
दि. 12 रोजी सायं. 5 वा. होणाऱया सत्रात सुगम संगीत क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल रजनी ठाकुर यांना संगीतकार व गायक पं. रामराव नायक यांच्याहस्ते ‘सुगमोत्सव’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सायं. 5.30 वा. ‘युवा मैफल’ होणार असून त्यात दुर्वा पेडणेकर, अर्कज नागवेकर, उर्विजा नागवेकर, साईदीप नाईक, मनाली पार्सेकर, अपर्णा तामसे, सोनवी नाईक या कलाकारांचा सहभाग असेल. त्यांना सुरेश घाडी, दामोदर नाईक, गौतम आमोणकर, अजित फडते व शशि फडते हे कलाकार साथसंगत करतील.
सायं. 6.30 वा. ‘बॉलिवूड रजनी’ हा चित्रपट गीतांवर आधारीत कार्यक्रम होणार आहे. त्यात अजय नाईक, राजवी नाईक, उमा नाईक, राजी खांडेपारकर, कौस्तुभ आपटे, डॉ. शुभ्रा कामत बोरकर, निळकंठ गावडे, दिशाली नाईक, प्रतिक बेतकीकर, आरती नाईक, तृप्ती गावकर, उमा प्रभूदेसाई, अश्विला लाड, संजना नाईक, राजेश देसाई, अक्षय नाईक, कालिंदी नाईक या कलाकारांचा सहभाग असेल. त्यांना कीबोर्डवर सुरेश घाडी, तबल्यावर रोहित बांदोडकर तसेच अजित फडते जेफरी व शशी फडते हे कलाकार साथसंगत करणार आहेत. योगीश जोशी हे निवेदन करतील.
सायं. 7.30 वा. ‘गझल मैफल’ होणार असून त्यात गोमंतकीय गायक व संगीतकार बाळकृष्ण मराठे हे हिंदी व मराठी गझला सादर करतील. त्यांना रोहित बांदोडकर तबल्यावर तर हार्मोनियमवर दत्तराज म्हाळशी साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम श्रोत्यांसाठी खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.