मशिदीच्या वास्तुला धोका : आदिलशहा कालीन ऐतिहासिक वास्तू
प्रतिनिधी / फोंडा
शापूर-फोंडा येथील ऐतिहासिक सफा मशिदच्या तलावाचा तटबंदीचा भाग कोसळला असून त्यामुळे या पुरातन वास्तुलाही धोका निर्माण झाला आहे. काल गुरुवारी सायं. 6.45 वा. सुमारास तटबंदीचा मोठा भाग कोसळून पडला. भारतीय पुरतत्त्व खात्याने अधोरेखीत केलेल्या गोव्यातील काही महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तुंमध्ये सफा मशिदचा समावेश होत आहे.
या मशीदचे बांधकाम इ. स. 1560 मध्ये इब्राहीम आदिलशहा यांनी केले होते. आदिशाहाने बांधलेल्या 27 महत्त्वाच्या मशिदींपैकी सफा मशिद ही एक आहे. या छोटीखानी मशिदीत स्तंभविरहीत प्रार्थना कक्ष आहे. सभोवताली अष्टकोनी चिरेबांधणीचे दहा स्तंभ आहेत. अंतर्गत भागात मिहराब असून तो पश्चिमाभिमुख आहे. मशिदीला लागूनच प्रशस्त असा तलाव असून त्याला दगडी बांधणीची पक्की तटबंदी आहे. या तटबंधीचा एक मोठा भाग कोसळला आहे. ज्यामुळे मशिदीच्या वास्तुला धोका पोचू शकतो. या घटनेची माहिती मिळताच मशिद समितीचे अध्यक्ष मुल्ला मुर्तुझा व अब्बास मुल्लाम यांनी घटनास्थळी पाहणी केली. पुरातत्त्व खाते तसेच इतर संबंधीत खात्यांच्या अधिकाऱयांना त्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
सफा मशिदमध्ये दिवसाकाठी पाचवेळा मौलानामार्फत नित्य नमाज पढला जातो. शिवाय ईदच्या दिवशी सामुहिक नमाजही पढला जात असल्याची माहिती अब्बास मुल्लांम यांनी दिली.