प्रतिनिधी/ फोंडा
अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी एका बिगरगोमंतकीय युवकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले. योगेश बसप्पा गानगेरे (वय 32, दत्तगड-बेतोडा, मूळ कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. फोंडा पोलिसांनी रविवारी दुपारी 1 वा. सुमारास केलेल्या धडक कारवाईमध्ये त्याच्याकडून 100 ग्रा. वजनाचा सुमारे रू. 12 हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. कुंडई औद्योगिक वसाहतीतील ऑटो क्राफ्ट कंपनीजवळ ही कारवाई करण्यात आली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संशयित युवक कुंडई येथे अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार फोंडा पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली. साधारण 100 ग्राम वजनाच्या गांजासह त्याला ताब्यात घेण्यात आले. उपअधिक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप, सहाय्यक उपनिरीक्षक जितेद्र गावडे, हवालदार केदारनाथ जल्मी, कॉन्स्टेबल वंदेश सतरकर, जयवंत भरतू, अमेय गासावी, पंकज देसाई यांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी संशयिताविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून पोलिस कोठडीत रवनगी करण्यात आली असून फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहे.