पॅरिस / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हैराण झालेल्या फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारमध्ये ते मागील 3 वर्षांपासून पंतप्रधान होते. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी एडवर्ड फिलिप यांचा राजीनामा स्विकारला आहे. पुढील काही तासांमध्ये नवीन पंतप्रधानाच्या नावाची घोषणा केली जाईल, असे मॅक्रॉन यांनी सांगितले. मात्र, जोपर्यंत नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली जात नाही, तोपर्यंत फिलिप कार्यभार सांभाळणार आहेत.
फ्रान्समधील कोरोना व्हायरसमुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्याने हा निर्णय घेतला गेल्याचे देखील सांगितले जात आहे. फ्रान्समध्ये पंतप्रधानाने 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा देणे काही नवीन गोष्ट नाही. यापूवीर्ही अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. मॅक्रॉन आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना राजकीय अडथळय़ांची शर्यत पार करावी लागत आहे.