फ्रान्समध्ये कोरोना विषाणूचा नवा संकरावतार आढळून आला आहे. कोरोनाच्या या अधिक संक्रामक स्वरुपाची ओळख ब्रिटनमध्ये झाली होती आणि दक्षिण आफ्रिका, नायजेरियातूनही याची प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनाच्या नव्या स्वरुपाने ग्रस्त व्यक्ती फ्रान्सचा नागरिक असून तो 19 डिसेंबर रोजी लंडनहून आला होता. संक्रमित व्यक्ती स्वतःच्या घरीच विलगीकरणात असल्याची माहिती फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
फ्रान्सने ब्रिटनसाठीच्या विमानसेवेवरील बंदी हटविली आहे. चाचण्यांचा अहवाल नकारात्मक येणाऱया लोकांना प्रवासाची अनुमती दिली जात आहे. इंग्लिश खाडी ओलांडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो लॉरीचालकांना नाताळाच्या दिवशी स्वतःच्या गाडीतच रहावे लागले.
नायजेरियातही नवा स्ट्रेन
यापूर्वी जपान, डेन्मार्क, नेदरलँड आणि ऑस्ट्रेलियानेही नव्या संकरावताराचे रुग्ण सापडल्याचे शुक्रवारी सांगितले होते. तर ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेनंतर नायजेरियातही कोरोनाचा एक नवा संकरावतार आढळून आला आहे. या नव्या स्वरुपाची अधिक माहिती मिळविण्यासाठी वैज्ञानिकांचे एक पथक अध्ययन करत आहे.
वेगळा आहे संकरावतार
नायजेरियाच्या या नव्या संकरावताराचे स्वरुप ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील विषाणूपेक्षा वेगळे असल्याची माहिती आफ्रिका सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे प्रमुख जॉन नेकेंगसाँग यांनी दिली आहे. या नव्या संकरावतारावरील संशोधन नायजेरिया सीडीसी आणि आफ्रिकन सेंटर ऑफ एक्सिलेंस फॉर जीनोमिक्स ऑफ इंफेक्शियस डिसिजचे वैज्ञानिक करत आहेत. नायजेरियात याचे अनेक रुग्ण सापडण्याची शक्यता आहे.
‘पी681एच’ नाव
लसींवर नायजेरियन संकरावताराचा संभाव्य प्रभाव अद्याप अस्पष्ट असल्याचे डॉ. नेपेंगसाँग यांनी सांगितले आहे. 3 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबरदरम्यान दक्षिण ओसुन राज्यात दोन बाधितांच्या नमुन्यांमध्ये विषाणूचे हे नायजेरियन स्वरुप आढळले होते. कोरोनाच्या या नव्या स्वरुपात ‘पी681एच’ नाव देण्यात आले आहे.