सीईएन पोलिसांचे मोठे यश : 12 लाख 56 हजार रुपये जप्त, 304 सीमकार्ड-48 मोबाईल घेतले ताब्यात
प्रतिनिधी /बेळगाव
बँकेतील तुमचे खाते अपडेट करायचे आहे. त्यासाठी केवायसी अर्ज भरायला हवा. तेव्हा तुमचे आधारकार्ड, बँक खाते याचे झेरॉक्स व्हॉट्सऍपवर पाठवून द्या, असे सांगून कंग्राळी खुर्द येथील एका निवृत्त बीएसएनलच्या कर्मचाऱयाची फसवणूक करण्यात आली होती. त्यानंतर सीईएन (सायबर एकॉनॉमिक्स व नॉर्कोटिक्स) पोलिसांनी पथके नेमून झारखंड येथील जमतारा जिल्हय़ातील एक संशयित आरोपी आणि महाराष्ट्रातील नाशिक येथील दोघे अशा एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 लाख 56 हजार रुपये जप्त केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
कंग्राळी खुर्द येथील निवृत्त बीएसएनएल कर्मचारी यल्लाप्पा नारायण जाधव (रा. मारुती गल्ली, कंग्राळी खुर्द) यांच्या बँक खात्यातून एका दिवसात 10 लाख रुपये हडप करण्यात आले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी 10 जून रोजी सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी तपासचपे फिरवून या प्रकरणी संशयितांना अटक केली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन आणि उपायुक्त विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले होते. त्यानंतर झारखंड येथे जाऊन त्या आरोपीला अटक करण्यात आली. तर त्याला मदत करणाऱया नाशिक येथील दोघा आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. एका दिवसात तब्बल 102 वेळा ओटीपी क्रमांक शेअर केल्यामुळे ही फसवणूक झाली असून बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे आहे असे सांगत भामटय़ांनी हा गंडा घातला होता.
यासंबंधी यल्लाप्पा जाधव यांनी सीईएन पोलिसात फिर्याद दिली होती. 9 जून रोजी ही घटना घडली असून केवळ एका दिवसात तब्बल 102 वेळा ओटीपी क्रमांक शेअर करायला भाग पाडून भामटय़ांनी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम हडप केली. या भामटय़ांनी गुलबर्गा, बेंगळूर, हैद्राबाद या ठिकाणी अनेक गुन्हे केल्याचे या तपासात उघडकीस आले आहे.
फिर्यादीदार यल्लाप्पा नारायण जाधव यांना बुधवार दि. 9 जून रोजी सकाळी 09339281627 या मोबाईल क्रमांकावरुन कॉल करण्यात आला होता. तुमच्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे द्या, असे भामटय़ांनी सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून एसबीआय मधील आपल्या अकाऊंट संबंधीची माहिती त्यांनी पाठविली. त्यानंतर या भामटय़ांनी त्यांच्या खात्यातील दहा लाख रुपये लांबविले.
या भामटय़ांना 15 जुलै रोजी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पाच मोबाईल तीन डेबिट कार्ड जप्त केले होते. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता 50 जणांच्या बँक खात्यावरील रक्कम लांबविल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी 48 मोबाईल, 304 सीमकार्ड आणि 50 बँक खात्याची विविध माहिती जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना एक मोठे यश मिळाले असून अजूनही काही आरोपी आहेत. त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.