नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता भाजपला दुसरा मोठा झटका बसण्याची शक्याता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते मुकुल रॉय यांची पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी होणार आहे. त्यांनी टीएमसीमध्ये परतण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मुकुल रॉय तृणमूल काँग्रेस प्रवेशाबद्दल आज निर्णय घेऊ शकतात. त्यांची आज दुपारी तीन वाजता टीएमसी अध्यक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक होणार आहे, त्यानंतर ते पक्षात प्रवेश करण्याबाबतचा निर्णय घेतील. या बैठकीत अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित असतील असे सांगितले जात आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुल रॉय केवळ ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये परत येऊ शकतात. टीएमसीमध्ये मुकुल रॉय यांची घरवापसी म्हणजे भाजपाला धक्कादायक ठरणार असून हा निर्णय बंगालमधील त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मुकुल रॉय हे टीएमसी सोडणारे सर्वात पहिले नेता होते. पक्षविरोधी कारवायाच्या ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी बाहेर केले होते. टीएमसीमध्ये असताना मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी टीएमसी सोडत भाजपात प्रवेश केला होता.