संभाव्य कारवाईने दापोलीतील शिकारी गायब
टाळसुरे/ वार्ताहर
दापोलीत बंदुका विक्रीचा पर्दाफाश झाल्याने अवैध शिकार करणारे पोलिसांच्या रडारावर आले आहेत. यामुळे या प्रकरणी आणखी आरोपी गजाआड होण्याची शक्यता आहे. दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही जिल्हय़ातील मोठी कारवाई मानली जात आहे.
दापोली परिसरातच 2500 ते 3000 रुपयांमध्ये बंदुका सहज उपलब्ध होत असल्याने अवैधरित्या बंदुका बाळगणाऱयांची संख्या लक्षणीय असल्याचे म्हटले जात आहे. सहजरित्या व अत्यल्प दरात बंदुका उपलब्ध होत असल्याने कोणतेही पूर्व प्रशिक्षण व कोणताही परवाना न काढता या बंदुकांचा वापर सुरु आहे. काहीजण तर दिवसाला 500 ते 800 रुपये भाडय़ाने देत असल्याची चर्चा आहे. भाडय़ाने बंदूक दिल्यास भाडय़ासोबतच शिकार केलेल्या प्राण्याच्या मांसामधील काही हिस्सा वाटणी म्हणून मिळतो. रत्नागिरी जिल्हय़ात डुक्कर, ससे, भेकरं, साळींदर या प्राण्यांच्या शिकारी मांसासाठी मोठय़ा प्रमाणात केल्या जात आहेत. काही प्रमाणात खवले मांजर, बिबटय़ा यांची शिकारही होत असल्याचे आढळून आले आहे. अवैध बंदुका शोधणे हे पोलिसांबरोबरच वनखात्यापुढील आव्हान बनले आहे.
या प्रकरणात काही राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींचा सहभाग असेल तर पोलीस कारवाईसाठीही मर्यादा येत आहेत का, याची पाहणी करणे महत्वपूर्ण आहे. दापोलीत झालेल्या कारवाईत काही ग्रामपंचायत सदस्यांचा सहभाग उघड झाल्याने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यात राजकीय हस्तक्षेप होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. दापोलीतील या धडक कारवाईमुळे जिल्हय़ातील शिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हय़ातील अजून कितीजणांची नावे पुढे येतात? अजून किती बंदुका ताब्यात घेतल्या जातील? किती बंदुकांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, या सर्व प्रश्नांचा उलगडा हळूहळू होणार आहे.
अनेक जिल्हय़ात बंदुका विकल्याचा संशय
या प्रकरणातील मास्टरमाइंड न्हानू पेंडूरकर हा पेंडूर (ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग) येथील असून त्याने आणखी कोणत्या जिल्हय़ात व रत्नागिरीमधील कोणकोणत्या तालुक्यात बंदुका पुरवल्या, याची माहिती तपासात पुढे येणार आहे. यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे कुठवर पोचलेली आहेत व या बंदुकांचे खरेदीदार कोण-कोण आहेत, ते पुढे येणार आहे. हा आकडा खूप मोठा असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पेंडुरकर याने लगतच्या गोवा राज्यातही अशा बेकायदा बंदुका पुरवल्या आहेत का, याचाही तपास करण्यात येणार आहे. असे आढळल्यास आंतरराज्य प्रकरण म्हणून त्याचा विचार होईल. पेंडुरकर बंदुकीचे सुटे भाग कोठून व कोणाकडून आणत होता, त्यांची देखील पोलीस हजेरी घेणार आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती कमालीची वाढली आहे.