गुंडेवाडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील अद्भुत घटना
गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर बसूनच सोडला प्राण
प्रतिनिधी / खंडेराजूरी
गुंडेवाडी (ता. मिरज) येथे शनिवारी एक अद्भूत घटना घडली. दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिवारी सकाळी एका वानराने प्रवेश केला. त्याने मारुतीरायाला दंडवत घालत प्राण सोडला. ज्या शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पुजा करतात. त्याच शनिवारी सदरचे वानर मंदिरात आल्याने आणि त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकात आश्चर्य व्यक्त होत आहे. भाविकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली आहे. दक्षिणमुखी पुरातन हनुमान मंदिरात या वानराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे.
गुंडेवाडी येथे दक्षिणमुखी पुरातन मारुती मंदिराचा जीर्णोद्धार गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी केला आहे. या मंदिरात सांगली, मिरज, अथणी, सातारा, कोल्हापूर, रायबाग, मुंबई, पुणे येथून भक्तगण प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी येत असतात. पण नवे वर्ष सुरू झाल्याने शनिवारी सकाळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. तितक्यात एक वानराचा कळप मंदिराजवळ असणाऱ्या झाडावर आले. या कळपातील एक वानर अचानक मंदिरात शिरले. ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर येऊन बसले. मंदिरातील मारुतीरायाला या वानराने साष्टांग दंडवत घालण्यास सुरुवात केली. सतत मंदिराच्या शेजारच्या झाडावर खेळणारे हे वानर आज साक्षात मारुतीरायाला नमस्कार करत आहे. ही बातमी हा हा म्हणता गावात पसरली आणि शेकडो ग्रामस्थ हा प्रकार पाहण्यासाठी मंदिराभोवती गोळा झाले. काही भाविकांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रिकरण केले.
काही वेळानंतर सदर वानर मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या दारात उंबऱ्यावरच बसून राहिले. भाविक मात्र दर्शन घेऊन जात होते. मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर दक्षिणेकडे तोंड करून हे वानर बराच वेळ तिथेच बसले होते. वानराची हालचाल बंद झाली होती. बराच उशिर वानर तेथून हालत नसल्याने ग्रामस्थांनी जवळ जावून पाहिले असता, सदर वानराने गाभाऱ्याच्या बरठ्यावरच प्राण सोडल्याचे स्पष्ट झाले.
विज्ञान युगात साक्षात पुरातन असणाऱ्या दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या उंबऱ्यावर वानराने प्राण सोडल्याची घटना ‘याची देही याची डोळा’ अनेक भाविकांना पाहायला मिळाली. शनिवार हा हनुमानाचा दिवस आणि हनुमान मंदिरातच वानराने प्राण सोडल्याची बातमी गुंडेवाडीसह परिसरातील भाविकांना समजल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. याबाबत गुंडेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पाटील व गुरव यांनी, त्या वानराने मंदिराच्या उंबऱ्यावर नमस्कार करत दोन्ही हात पुढे करून मान टेकून आपला प्राण सोडला असल्याचे सांगितले.
मंदिराच्या शेजारीच अंत्यसंस्कार
ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाचा जयघोष करत विधिवत मंदिराच्या शेजारीच वानराचे अंत्यसंस्कार केल्याचे सांगण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. वानराच्या अशा मृत्यूबद्दल अनेक भाविकांनी हळहळ व्यक्त केली. यावेळी रमेश सुबराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत पांढरे, धनंजय पाटील, बाबासो गडदे, प्रशांत गुरव, हिंमत पाटील, आनंदराव कटारे, अशोक मासाळ, दिलीप वाघमारे, शिवाजी चौगुले आदि ग्रामस्थ उपस्थित होते.