वृत्तसंस्था/ रोम
ऑलिंपिक वर्षांतील येथे सुरू असलेल्या रोम मानांकन सिरीज आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्ल बजरंग पुनिया आणि रवी कुमार दाहिया यांनी सुवर्णपदके पटकाविली. या स्पर्धेत भारताने एकूण 7 पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत शनिवारी रात्री झालेल्या 65 किलो फ्रीस्टाईल वजन गटातील अंतिम लढतीत भारताच्या बजरंग पुनियाने अमेरिकेच्या जॉर्डन ऑलिव्हरचा 4-3 अशा गुणांनी पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. 61 किलो फ्रीस्टाईल वजनगटात भारताच्या रवीकुमार दाहियाने कझाकस्तानच्या अबेदुलीयेव्हचा 12-2 अशा गुणांनी दणदणीत पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सोनेपतच्या 23 वर्षीय रवीकुमारने या स्पर्धेत 57 किलोऐवजी 61 किलो वजन गटात सहभाग दर्शविला होता.
महिलांच्या विभागात भारताच्या विनेश फोगट आणि अनशु मलिक यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकाविली. ग्रीको रोमन प्रकारात गुरूप्रित सिंगने 82 किलो गटात सुवर्णपदक, सुनीलकुमारने 97 किलो वजनगटात रौप्यपदक तर साजन बनवालने 77 किलो गटात कास्यपदक मिळविले.