अहमदाबाद / वृत्तसंस्था
खेळाडूंना राष्ट्रीय संघाकडून खेळताना जितके मानधन मिळते, त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक मानधन आयपीएल प्रँचायझीकडून खेळताना मिळते, ही बाब सर्वश्रुत आहे. साहजिकच, बहुतांशी खेळाडूंचा ओढा आयपीएल खेळण्याकडेच अधिक असतो आणि इंग्लिश फलंदाज जोस बटलरने देखील हीच बाब आणखी एकदा अधोरेखित केली.
आयपीएलमध्ये आपला संघ बाद फेरीत पोहोचला तर त्याच कालावधीत होणाऱया न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत आपण खेळणार नाही, असे इंग्लिश क्रिकेट मंडळाला कळवू आणि आयपीएलला प्राधान्य देऊ, असे जाहीरपणे बटलर म्हणाला. जोस बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स प्रँचायझीचे प्रतिनिधीत्व करतो. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 9 एप्रिल ते 30 मे या कालावधीत होणार आहे तर इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध 2 जूनपासून कसोटी मालिकेत लढणार आहे. त्यामुळे, राजस्थानचा संघ बाद फेरीत पोहोचला तर बटलर कसोटी मालिकेतील पहिल्या टप्प्यात खेळणे कठीण ठरु शकते.
आयपीएलमध्ये विविध संघातून इंग्लंडचे 12 क्रिकेटपटू प्रतिनिधीत्व करत आले असून यात बटलरसह बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर (राजस्थान), मोईन अली, सॅम करण (चेन्नई), टॉम करण (दिल्ली कॅपिटल्स), डेव्हिड मलान (किंग्स इलेव्हन पंजाब) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.