सर्वसामान्य माणसाला वन रुम किचनचा एक फ्लॅट घेताना नाकीनऊ येतात. आयुष्यभराची कमाई त्यात घालावी लागते. शिवाय कर्जाचा बोजा पडतो तो वेगळाच. पण अशाच सर्वसामान्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिलेले अनेक चित्रपट कलाकार शेकडो कोटी रुपयांच्या आलिशान मालमत्तांचा उपभोग घेताना दिसतात. एका संस्थेने या संदर्भात केलेले सर्वेक्षण स्वारस्यपूर्ण आहे.
बॉलिवूडचे आतापर्यंतचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईत नुकतीच डुप्लेक्सची खरेदी केली आहे. या मालमत्तेची किंमत 31 कोटी रुपये सांगितली जाते. आणखी एक स्टार अर्जुन कपूर याने आपली प्रेयसी मलाईका अरोरा हिच्या सोसायटीजवळच घेतलेल्या समुद्राभिमुख घराची किंमत किमान 23 कोटी असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात ती त्याहूनही अधिक असावी, असा काहींचा अंदाज आहे.
जान्हवी कपूर या चित्रपट नायिकेने नुकत्याच खरेदी केलेल्या घराची किंमत 39 कोटी आहे. ही एक ट्रिप्लेक्स मालमत्ता आहे. सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रीने या वर्षाच्या सुरुवातीलाच नवे घर घेतले असून त्याची किंमतही 30 कोटींच्या खाली नाही. अनेक कारणांमुळे सकारात्मक व नकारात्मक पद्धतीने गाजलेला अभिनेता संजय दत्त यानेही नुकतेच घर खरेदी केले असून किंमत 50 कोटी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या सर्व चित्रपट कलाकारांची घरे असूनही नव्या मालमत्ता खरेदी करण्याची हौस त्यांना आहे.