प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्त्यांचा विकास साधण्यात येत असून रस्ते काँक्रीटचे बनविले जात आहेत. या मार्गावरील एका बाजूच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या एकेरी रस्त्यावर आता रिक्षा व पादचाऱयांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
बसस्थानकासमोरील रस्ता स्मार्ट सिटीअंतर्गत काँक्रीटचा तयार करण्यात येत आहे. एका बाजूचे काम झाले असून दुसऱया बाजूचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या मार्गावर आता फेरीवाले, व्यावसायिक व प्रवाशी रिक्षा थांबत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शिवाय बसस्थानकात जाणाऱया पादचाऱयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्मार्ट बसस्थानकाचे काम सुरू असल्याने बस आवारात तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. याबरोबरच बसस्थानकात येण्यासाठी जुन्या पी. बी. रोडवरून प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली आहे. सीबीटी-मध्यवर्ती बसस्थानक जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवेश करण्यासाठी केवळ पादचाऱयांसाठी जुने प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांबरोबर प्रवासी वाहतूक करणाऱया रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात प्रवेश करताना गैरसोय होत आहे. शिवाय वाहतूक कोंडीदेखील निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांना व रिक्षावाल्यांना शिस्त लावण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.