प्रतिनिधी /बेळगाव
परिवहन मंडळाच्या जुन्या बस कुठे बंद पडतील याची शाश्वती प्रवाशीच नाही तर चालकांनाही नसते. बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास धर्मवीर संभाजी चौक येथे रस्त्यातच बस बंद पडली. यामुळे कॉलेज रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. यामुळे वाहनचालक बराच वेळ अडकून पडल्याने संताप व्यक्त करीत होते.
बस जुन्या झाल्या तरी त्या अद्याप वापरात आहेत. जुन्या बस या शहरात न सोडता ग्रामीण भागात सोडल्या जातात. बऱयाचवेळा ग्रामीण भागातील नागरिकांनाच धक्का मारून त्या सुरू कराव्या लागतात. बुधवारी अशीच काहीशी परिस्थिती शहरात पाहायला मिळाली. बेळगाव-हंगरगा ही बस धर्मवीर संभाजी चौकात अचानक बंद पडली. मुख्य रस्त्यावरच बस बंद पडल्याने मागून येणाऱया वाहनांची गती कमी होत गेली. बसमुळे वाहने अडकून असल्याने ती पुढे जाण्यास वेळ लागत होता. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कॉलेज रोडवर नेमकी कशाने वाहतूक कोंडी झाली, याची माहिती कोणालाच नव्हती. कोंडी वाढल्याने वाहतूक पोलीसही हतबल झाले होते. बऱयाच प्रयत्नांनी बस बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.