ढाक्का
बांगलादेशचा माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू मश्रफे मोर्तझा तसेच माजी क्रिकेटपटू नफिस इक्बाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
बांगलादेशचा माजी कर्णधार मुर्तझा याची शनिवारी कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्या चाचणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. मात्र या संदर्भात स्वत: मोर्तझाची प्रतिक्रिया उपलब्ध होवू शकली नाही. मोर्तझाची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यामध्ये त्याला या धोकादायक रोगाची बाधा झाल्याचे आढळून आले. मोर्तझाला ढाक्क्यातील त्याच्या निवासस्थानी विलग राहावे लागेल, असे सांगण्यात आले.
मोर्तझाला कोरोना व्हायरसचा कसा संपर्क झाला हे मात्र समजू शकले नाही. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत तो अस्वस्थ होता.. त्यामुळे त्याची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत मोर्तझाला बाधा झाल्याचे आढळून आले. काही दिवसापूर्वी मोर्तझाच्या काही सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती बांगलादेशच्या प्रसार माध्यमाने दिली होती.
बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू तसेच बांगलादेशच्या वनडे संघाचा विद्यमान कर्णधार तमीम इक्बाल याचा मोठा भाऊ नफिस इक्बालला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले.
34 वर्षीय नफिस इक्बालने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 11 कसोटीत 518 धावा तर 16 वनडे सामन्यात 309 धावा जमविल्या आहेत. चित्तगावमध्ये नफिस इक्बाल सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. सदर बातमी बांगलादेशमधील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.
2003 साली नफिस इक्बालने क्रिकेट पदार्पण केले होते पण 2010 नंतर त्याला राष्ट्रीय संघातील आपले स्थान राखता आले नाही. गेल्या महिन्यात बांगलादेशच्या क्रिकेट संघाचे विकास प्रशिक्षक आणि माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू अश्कर रेहमानलाही कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पाकचे शाहीद आफ्रिदी, तौफिक उमर आणि झफार सर्फराज या तीन क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे.