वृत्तसंस्था / अबु धाबी
संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरु असलेल्या अबु धाबी टी-10 लीग क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात बांगला टायगर्सने नॉर्दन वॉरियर्सचा 5 गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेतील बांगला टायगर्सचा हा पहिला विजय आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नॉर्दन वॉरियर्सने 10 षटकात 4 बाद 126 धावा जमविल्या. त्यानंतर बांगला टायगर्सने 5 चेंडू बाकी असताना 5 बाद 130 धावा जमवित हा सामना जिंकला.
नॉर्दन वॉरियर्स संघाच्या डावात विंडीजच्या कर्णधार आर. पॉवेलने 27 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह 63 धावा झोडपल्या. समित पटेलने 13 चेंडूत नाबाद 21 धावा जमविल्या. या जोडीने 35 चेंडूत 80 धावांची भागीदारी केली. बांगला टायगर्सतर्फे वूडने 18 धावात 1 गडी बाद केला. त्यानंतर बांगला टायगर्सच्या डावात जॅक्सने 22 चेंडूत नाबाद 57 तर हॉवेलने 11 चेंडूत नाबाद 35 धावा झळकविल्या. या जोडीने 6 व्या गडय़ासाठी अभेद्य 72 धावांची भागीदारी 29 चेंडूत नोंदवित संघाला 5 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला. तत्पूर्वी बांगला टायगर्सने आपले पहिले 5 फलंदाज केवळ 58 धावात गमावले होते. नॉर्दन वॉरियर्सतर्फे उमर अलीने 9 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
नॉर्दन वॉरियर्स – 10 षटकात 4 बाद 126 (आर. पॉवेल 63, समीत पटेल नाबाद 21, वूड 1-18), बांगला टायगर्स – 9.1 षटकात 5 बाद 130 (जॅक्स नाबाद 57, हॉवेल नाबाद 35, उमरअली 1-9).