क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज बुधवारी बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर केरळ ब्लास्टर्सचा सामना मुंबई सिटी एफसीशी होईल. सध्या 30 गुणांनी पहिल्या स्थानावर असलेल्या मुंबई सिटी एफसी संघाने 14 सामन्यांतून 9 विजय नोंदविले असून 3 सामने बरोबरीत सोडविले असून दोन सामने गमविले आहेत. केरळ ब्लास्टर्सचे 15 सामन्यांतून तीन विजय व प्रत्येकी सहा पराभव व बरोबरीने 15 गुण झाले आहेत.
केरळ ब्लास्टर्सचे मुंबई सिटीविरुद्धचे रेकॉर्ड खराब आहे. गेल्या पाच सामन्यांत ब्लास्टर्सला एकही विजय मिळविता आलेला नाही. तीन पराभव व दोन बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. यानंतरही ब्लास्टर्सचे प्रशिक्षक किबू व्हिकुना यांना आशा वाटते.
मुंबई सिटी एफसीचा संघ स्पर्धेत आघाडीवर आहे. त्यांचा संघ समतोल आणि चांगला आहे. आमच्यासमोर मोठे आव्हान असेल. आम्हाला पुनरागमन करून विजय मिळवावा लागेल. आम्ही मुंबई सिटीच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असे व्हिकुना म्हणाले.
मागील लढतीत केरळ ब्लास्टर्सला दोन गोलांच्या आघाडीनंतर एटीके मोहन बागानविरूद्ध 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यात काही वादग्रस्त निर्णय त्यांच्या विरोधात गेले.
व्हिकुना यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असून संघाच्या तयारीवर लक्ष केंदीत केले आहे. आम्हाला या सामन्यात लक्ष एकाग्र करावे लागेल असे ते माध्यमांना संबोधित करताना म्हणाले.
मुंबई सिटीचा अलिकडील खराब फॉर्मातून सावरण्याचा प्रयत्न असेल. गेल्या चार सामन्यांत त्यांना एकच विजय मिळविता आला आहे. या मोहिमेत त्यांना नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरूद्ध दुसरा पराभव पत्करावा लागला. अशी स्थिती येऊ शकते याची आम्हाला कल्पना होती. याचे कारण मोसमात एकाही सामन्यात पराभव होणार नाही, अशी स्थिती प्रत्यक्षात येणे अशक्य असते. आम्ही पहिला सामना नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरूद्ध हरलो होता. आतापर्यंत एकाच मोसमात कोणताही संघ सलग बारा सामने अपराजित राहिला नव्हता, असे मुंबई सिटी एफसीचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा म्हणाले.
आमचे खेळाडू प्रतिसाद देण्यासाठी सज्ज झाले आहेत. याचे कारण या चुरशीच्या स्पर्धेत अशी स्थिती येणे शक्य होती. आम्ही याचा संघावर प्रतिकूल परिणाम होऊ देणार नाही. आम्हाला खेळात सुधारणा करावी लागेल आणि नेहमीच्या महत्वाकांक्षेने आणि नेहमीच्या पद्धतीने खेळावे लागेल. नेहमीप्रमाणेच आम्हाला चुकांपासून बोध घ्यावा लागेल, पण मला जास्त चिंता वाटत नसल्याचे सर्जिओ लॉबेरा म्हणाले.