निफ्टी निर्देशांकात 152 अंकांची घसरण, युपीएल, रिलायन्स नफ्यात
कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी तेजी व जागतिक बाजारातील घसरणीच्या कारणास्तव भारतीय शेअर बाजारावर आज आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी चांगलाच दबाव दिसून आला. बीएसई सेन्सेक्समध्ये 470 अंकांची तर निफ्टीत 152 अंकांची घसरण दिसून आली.
सोमवारी शेअर बाजारात सेन्सेक्सचा निर्देशांक 470 अंकांच्या घसरणीसह 48,564.27 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीचा निर्देशांक 152 अंकांच्या घसरणीसह 14,281.30 वर बंद झाला. दिवसभरात एकावेळी सेन्सेक्स 464 अंकांपर्यंत खाली कोसळला होता. ओएनजीसीचे समभाग 4.29 टक्के इतके घसरले होते. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह व इंडसइंड बँक यांचे समभागही 3 टक्के घसरले होते. चौफेर घसरण राहिल्याने लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 192.84 लाख कोटी रुपये राहिले होते. याचप्रमाणे निफ्टीही 155 अंकानी घसरुन निर्देशांक 14277.90 वर व्यवहार करत होता. यात टाटा मोटर्सचे समभाग 5 टक्के घसरण नोंदवत होते.
या व्यतिरिक्त हिंडाल्को, ओएनजीसी, टाटा स्टीलचे समभागही 4 टक्के इतके खाली आले होते. युपीएलचे समभाग मात्र दुसरीकडे 3 टक्के तेजी दर्शवत होते. गुंतवणूकदार सोमवारी धातू व ऑटो क्षेत्रातील समभाग सर्वाधिक विक्री करताना दिसले. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या दरात तेजी दिसली आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा (आयआरएफसी )2021 चा पहिला आयपीओ बाजारात दाखल झाला. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. आयआरएफसी 4 हजार 633 कोटी रुपये आयपीओतून उभारणार असल्याचे समजते.
अर्थसंकल्पाआधी गुंतवणूकदार गुंतवणूकीबाबत चिंतेत आहेत. तज्ञांच्या मते कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प अपेक्षेइतका असणार नाही. त्यामुळेच बाजारात निर्देशांकांमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. या आठवडय़ात कंपन्यांचे तिमाही निकाल येणार असून जागतिक घडामोडींवरही शेअर बाजाराची दिशा ठरणार आहे.