नवी दिल्ली
लर्निंग ऍप ‘बायजूस’ने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या सर्व जाहिराती सध्या बंद केल्या आहेत. प्री-बुकिंग केल्यानंतरही जाहिराती रिलीज होत नाहीत. अमली पदार्थ प्रकरणात मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुखला मोठा धक्का बसला आहे. शाहरुखच्या प्रायोजकत्वाच्या व्यवहारांमध्ये बायजू हा सर्वात मोठा ब्रँड होता. लर्निंग ऍप ‘बायजूस’ शाहरुखला जाहिरातीसाठी दरवषी 3 ते 4 कोटी रुपये देते. शाहरुख 2017 पासून त्यांच्यासाठी प्रमोशनल जाहिराती करत आहे. ‘बायजूस’ ऍप ऑनलाईन लर्निंगसाठी भारतात प्रचंड लोकप्रिय असलेल्या ऍपपैकी एक आहे. ऑनलाईन शिक्षणप्रणालीमुळे मागील काही वर्षांमध्ये ‘बायजूस’च्या लोकप्रियतेत आणि वापरात वाढ झाली आहे. शाहरुखकडे आयसीआयसीआय बँक, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टुरिझम, हय़ुंडाई यासारख्या कंपन्यांच्या जाहिरातीही आहेत.