मुंबई / वृत्तसंस्था
राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोनने आयपीएल बायो-बबलच्या बाहेर येत मायदेशी परतणे पसंत केले. तो सोमवारी मायदेशी रवाना झाला असल्याचे राजस्थान प्रँचायझीने जाहीर केले. बायो-बबलमध्ये कोंडमारा होत असल्याने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे त्याने कळवले आणि प्रँचायझीने देखील त्याच्या या निर्णयाचा आपल्याला आदर असल्याचे नमूद केले आहे. मात्र, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स यांच्यासारखे पहिल्या पसंतीचे क्रिकेटपटू यापूर्वीच बाहेर गेले असलेल्या राजस्थानसाठी लिव्हिंगस्टोनच्या निर्णयामुळे हा आणखी एक धक्का ठरला आहे.
लियाम लिव्हिंगस्टोन मागील 6 महिन्यांपासून अनेक बायो-बबलमध्ये राहिला. गतवर्षाच्या उत्तरार्धात इंग्लंडने दक्षिण आफ्रिका दौरा केला, त्यावेळी त्याचा संघात समावेश होता. त्यानंतर तो तब्बल दोन महिने बिग बॅश लीग प्रँचायझी पर्थ स्कॉर्चर्सच्या बायो-बबलमध्ये समाविष्ट होता. नंतर त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारत दौऱयात भाग घेतला. अहमदाबादमध्ये वनडे मालिकेत पदार्पण केल्यानंतर तो राजस्थान रॉयल्सच्या बायो-बबलमध्ये सहभागी झाला.
जागतिक स्तरावरील बऱयाच दिग्गज खेळाडूंना सातत्याने बायो-बबलमध्ये राहणे त्रासदायक असल्याचे जाणवत आले असून या कारणामुळे जोश हॅझलवूड (चेन्नई), जोशुआ फिलीप (आरसीबी), मिशेल मार्श (हैदराबाद) यांनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेला रामराम ठोकला आहे. अगदी भारतीय कर्णधार विराट कोहलीने देखील या आव्हानात्मक परिस्थितीत अति क्रिकेट भरवले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.