जी-20’ परिषदेच्या औचित्याने होणार भेट ः तैवानचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता
बाली / वृत्तसंस्था
जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील महत्त्वाच्या देशांमधील ज्येष्ठ नेते बालीमध्ये एकवटणार आहेत. या परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे. दोन्ही नेते अमेरिका आणि चीनमधील संवाद आणि संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करतील. याशिवाय तैवान हासुद्धा चर्चेचा केंद्रबिंदू असणार आहे. 2020 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जिनपिंग यांच्यासोबत बिडेन यांची ही पहिलीच आमने-सामने भेट असणार आहे. यापूर्वी हे दोन्ही नेते उपराष्ट्राध्यक्ष असताना भेटले होते.
इंडोनेशियातील बाली येथे 15-16 नोव्हेंबर रोजी जी-20 परिषद होणार आहे. जी-20 मध्ये भारत, अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांचे नेते सहभागी होणार आहेत. जी-20 फोरममध्ये 20 देश असून त्यात जगातील विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था समाविष्ट आहेत. या देशांमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.
अमेरिका-चीन संबंधात तैवान महत्त्वाचा मुद्दा
तैवानच्या मुद्दय़ावरून अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध वेळोवेळी ताणले गेलेले दिसतात. चीन तैवानला आपला भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश म्हणून पाहतो. तथापि, अमेरिका चीनला काही मुद्दय़ांवर पाठिंबा देत असले तरी तैवानवर चीनचा कब्जा पाहू शकत नसल्याचे दिसून येते. आता दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आपण जिनपिंग यांच्याशी तैवानच्या मुद्यावर बोलणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच तैवानबाबत अमेरिकेच्या धोरणात बदल करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका त्याच्या मदतीला येईल, असे बिडेन यांनी यापूर्वी अनेक वेळा म्हटले आहे. चीनच्या धमकीला न जुमानता अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी 2 ऑगस्ट रोजी तैवानच्या दौऱयावर तैपेईला पोहोचल्यापासून अमेरिका आणि चीनमधील तणाव आणखी वाढला होता. तसेच तैवानच्या हद्दीत चिनी विमानांची घुसखोरी वाढली आहे. चीन तैवानला एकटे पाडण्यासाठी आणि धमकावण्यासाठी मुत्सद्दी आणि लष्करी बळाचा वापर करत आहे.
रशियन अध्यक्षांच्या उपस्थितीबाबत शंका
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन जी-20 मध्ये सहभागी होणार नसल्याचे बोलले जात आहे. युपेनसोबतच्या युद्धात रशियन सैन्य मागे पडत असताना जी-20 मध्ये सहभागी होण्यासाठी बाली येथे न जाण्याचा पुतिन यांनी निर्णय घेतला आहे. पेमलिन पाश्चात्य देशांकडून होणारा निषेध टाळण्याचे मार्गही शोधत आहे. पुतिन यांच्याऐवजी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव हे देशाचे प्रतिनिधित्त्व करणार असल्याचे समजते.