हेस्कॉमकडून कॅन्टोन्मेंटला इशारा : 3 कोटी 13 लाखाचे बिल थकीत
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डला शासनाकडून अनुदान मंजूर करण्यात आले नसल्याने पाणी बिल आणि हेस्कॉमच्या बिलाची रक्कम थकली आहे. हेस्कॉमचे आतापर्यंत 3 कोटी 13 लाखाचे वीजबिल थकले असल्याने बिल अदा करण्याची सूचना करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत बिल अदा न केल्यास कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाचा विद्युतपुरवठा तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डला मागील चार वर्षांपासून केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला नाही. यापूर्वी राज्य शासनाकडून एसएफसी अनुदानांतर्गत कॅन्टोन्मेंट बोर्डला निधी देण्यात येत होता. त्यामुळे हेस्कॉमचे वीजबिल अदा करण्यात येत होते. पण मागील काही वर्षांपासून राज्य शासनाकडून कोणतेच अनुदान मंजूर करण्यात आले नाही. तसेच केंद्र शासनाकडून विकासकामे राबविण्यासाठी निधी दिला जात होता. पण केंद्र शासनाने देखील कॅन्टोन्मेंट बोर्डची बोळवण केली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डकडे विकासकामे राबविण्यासह पाणीपट्टी आणि विद्युत बिलाची रक्कम भरण्यासाठीही निधी नाही. परिणामी वीजबिल आणि पाणी बिलाची रक्कम थकली आहे.
विद्युत पथदीप, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, शाळा, अधिकारी व कर्मचाऱयांचे क्वॉर्टर्स, व्यावसायिक संकुल, रुग्णालय, पाणीपुरवठा करणारे विद्युतपंप तसेच ठिकठिकाणी असलेल्या कूपनलिकांच्या विद्युतपंपांचे वीजबिल अदा करण्यात आले नाही. त्यामुळे आतापर्यंत हेस्कॉमचे 3 कोटी 13 लाख रुपये बिल थकले आहे.
हेस्कॉमकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला अनेकवेळा नोटिसा
बिल भरण्यासाठी हेस्कॉमकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला अनेकवेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पण निधी नसल्याचे सांगून प्रत्येकवेळी वेळ मारून नेण्यात येत होती. पण सध्या बिलाची रक्कम वाढल्याने सोमवारपर्यंत अदा करण्याची सूचना हेस्कॉमने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली आहे. सोमवारपर्यंत थकलेले वीजबिल अदा न केल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डचा वीजपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा हेस्कॉमकडून देण्यात आला आहे.